संदीप टूले
पुणे : पुणे जिल्ह्यातील अनेक भागात व खडकवासला धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून खडकवासला धरणातून होणारा विसर्गाचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. विसर्गाचे प्रमाण कमी केल्यामुळे दौंड तालुक्यातील मुळा मुठा भीमा नदी पात्राशेजारील शेतजमिनीतील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. तसेच पारगाव ते वाघोली मार्गावरील राहू येथील पुल ही वाहतुकीसाठी सुरळीत झाला आहे. तसेच दौंड तालुक्यातील अनेक भागातील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे व छोटे मोठे पुल ही वाहतुकीसाठी संध्याकाळ पर्यंत सुरळीत होतील अशी परिस्थिती आहे.
पुणे जिल्ह्यात सलग मागील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर धरणातून येणारा विसर्ग व पावसाचा धुमाकूळ यामुळे शेतकऱ्यांचे बरेचसे नुकसान केले आहे. मात्र, आज सकाळपासून ढगाळ वातावरण असले तरी पावसाच्या सारी अधून मधून येत आहेत. त्यामुळे नागरिक देखील घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे.
खडकवासला धरणातून आजचा विसर्ग अद्यापही सुरु आहे. मात्र सकाळी ७ वाजता पाण्याचा विसर्ग २०६९१ क्युसेक वरून १३९८१ क्युसेक पऱ्येंत घटविण्यात आल्याने पूरस्थिती निवळण्यास आणखीनच मदत होईल अशी शक्यता आहे.