पुणे, ता.२६ : गेल्या वर्षभरात ‘नॅशनल कॅडेट कोअर’चे (एनसीसी) शंभराहून अधिक छात्र लष्करात अधिकारी म्हणून दाखल झाले असल्याची माहिती ‘एनसीसी’चे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरूबीर पाल यांनी दिली. याशिवाय ‘एनसीसी’मधील २२ टक्के छात्रांनी अग्निवीर भरती प्रक्रियेत सहभाग घेतला असून, त्यातील बहुतांश छात्र लष्करात दाखल झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘एनसीसी’मधील छात्र लष्करात प्रवेशित व्हावेत, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे पाल यांनी स्पष्ट केले.
‘आयएनएस शिवाजी’चे प्रमुख कमांडंट कमोडोर मोहित गोएल यावेळी उपस्थित होते. लेफ्टनंट जनरल पाल यांच्या हस्ते इंडियन नौदल शिबिरात झालेल्या ‘बोट पुलिंग’ या स्पर्धेच्या विजेत्यांना पदक देऊन गौरवण्यात आले.
गेल्या वर्षभरात ‘एनसीसी’द्वारे प्रशिक्षण पूर्ण केलेले १०० हून अधिक छात्र नौदल, लष्कर आणि वायूसेनेत अधिकारी म्हणून दाखल झाले आहेत. गेल्यावर्षी सुरू झालेल्या अग्नीवीर भरती प्रक्रियेत ‘एनसीसी’चे ‘बी’ आणि ‘सी’ प्रमाणपत्र मिळवलेल्या २२ टक्के विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. भारतीय संरक्षण दलांच्या दृष्टीने ही अतिशय समाधानकारक बाब असून, यापुढेही आम्ही अधिकाधिक छात्रांनी संरक्षण दलांमध्ये दाखल व्हावे, यासाठी प्रयत्न करणार आहोत,’ असे पाल यांनी सांगितले.
संरक्षण दलांमध्ये होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर ‘एनसीसी’चा अभ्यासक्रमही बदलण्यावर आम्ही भर देत आहोत. अनेक महाविद्यालये, विद्यापीठांकडून ‘एनसीसी’साठी मागणी वाढत आहे, त्याचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला असून, केंद्र सरकार ‘एनसीसी’च्या विस्तारावर निर्णय घेईल, याकडे पाल यांनी लक्ष वेधले.
सीमाभागात ‘एनसीसी’चा विस्तार पूर्ण
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी २०२० मध्ये भारताच्या सीमाभागात व समुद्रकिनारी प्रदेशात ‘एनसीसी’चा विस्तार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सर्व सीमाभागात, किनारी प्रदेशांत ‘एनसीसी’चा विस्तार झाला असून, जवळपास एक लाख नव्या जागा निर्माण झाल्या आहेत. त्यासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आल्याचे लेफ्टनंट जनरल गुरूबीर पाल यांनी सांगितले.
२०४ महिला छात्रांचा सहभाग
इंडियन नौदल शिबिरात ‘एनसीसी’च्या देशातील १७ नेव्हल संचलनालयांमधील एकूण ६१२ छात्रांची निवड करण्यात आली होती. कॅम्पमध्ये ‘बोट पुलिंग’, ‘बोट रायडिंग’, ट्रेंट पिचिंग, ‘लाइन एरिया’, ‘फायरिंग’, ‘ड्रील’ अशा एकूण १० प्रकारांत या विद्यार्थ्यांच्या संचलनालयाप्रमाणे स्पर्धा घेण्यात आल्या. यात छात्रांनी सर्व स्पर्धांमध्ये शर्थीची मेहनत घेतली. विशेष म्हणजे या कॅम्पमध्ये २०४ महिला छात्रांचा सहभाग होता.