पुणे : विधानसभा निवडणुकांच्या प्रचार तोफा थंडावल्या आहेत. या निवडणूक प्रचारादरम्यान अनेक नेत्यांनी आपल्या विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. अशाच प्रकारे दौंड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी मैदानात असणारे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्यावर महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांनी टीका केली आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारासाठी खासदार निलेश लंके आले होते. तेव्हा त्यांनी जोरदार बॅटिंग करत महायुतीच अधिकृत उमेदवार राहुल कुल यांना विकास कामांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी समोरासमोर या अस आव्हान देखील दिले होते. याला आमदार राहुल कुल यांनी पाटस येथे पत्रकार परिषद घेऊन मी आव्हान स्विकारतो असे म्हणत आमदार राहुल कुल यांनी रमेश थोरात यांना चर्चा करण्यासाठी पत्रकरांनी निमंत्रित करावं, असे सांगितले होते.
याबाबत रमेश थोरात यांना यवतमध्ये पत्रकरांनी विचारले असता रमेश थोरात यांनी विषयाला बगल दिली आणि कुल याचे आव्हान एक प्रकारे नाकारले आहे. यावर आमदार राहुल कुल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, खासदार निलेश लंके यांनी दिलेले आव्हान मी स्वीकारले होते परंतु आमचे विरोधक मात्र चर्चेला न येता पळ काढत आहेत, त्यामुळे त्यांना दौंड तालुक्यातील विकास मान्यच आहे, असे दिसून येत आहे.