राहुलकुमार अवचट
यवत : रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक कमानी, रोषणाईने सजविलेल्या मंदिरांमध्ये दुपारी श्रीरामाचा जयघोष झाला अन् ‘राम जन्मला गं सखी, राम जन्मला’, ‘सियावर रामचंद्र की जय… पवनसुत हनुमान की जय… प्रभू रामचंद्र भगवान की जय’… अशा जयघोषाने यवत येथील श्री विठ्ठल मंदिर परिसर दुमदुमदून गेला. भजन आणि श्रीरामाच्या नामस्मरणाने मंदिरातील वातावरण भारावले.
यवत येथील विविध भागांतील मंदिरांमध्ये राम नवमीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यवत येथे विठ्ठल मंदिर येथे असलेल्या प्रमुख राममंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची वर्दळ सुरू होती. श्री विठ्ठल समाज भजनी मंडळ व यवत ग्रामस्थ यांच्या वतीने श्रीराम जन्म सोहळा साजरा करण्यात आला. सकाळी ९ वाजल्यापासून भजनाचा कार्यक्रम सुरू होता. दुपारी १२ वाजता राम नामाचा जयघोष व फुलांची उधळण करत पारंपरिक पद्धतीने रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे अशोक दोरगे व ग्रामस्थांच्या वतीने भाविकांना लिंबू सरबताचे वाटप करण्यात आले. तर राम जन्मोत्सवानिमित्त श्री महालक्ष्मी मंदिर येथे श्रीरामाची मूर्तीला फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी श्री महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव ट्रस्ट यांच्यावतीने श्री महालक्ष्मी मातेची पूजा संपन्न झाली. यानंतर डॉ. श्याम कुलकर्णी यांच्या हस्ते श्री रामांच्या मूर्तीची पूजा व प्रभू श्रीरामांची आरती करण्यात आली.
यावेळी गणेश शेळके, गणेश कोळपे, काश्मीरा मेहता, शितल शेळके, पुनम जाधव यांसह महिला व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री महालक्ष्मी मंदिरासह यवत परिसरातील दोरगेवाडी, यवत स्टेशन, इंदिरानगर यांसह विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी एसएमएस, सोशल नेटवर्किंग साईटवरूनही श्रीरामाचे फोटो पाठवून एकमेकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.