पुणे : राज्याच्या काही भागात उष्णतेच्या झळा बसत आहेत, तर काही भागात मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुढील तीन-चार दिवस पावासाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उच्च तापमान आणि हवेतील आर्द्रता यामुळे पावसाचे वातावरण तयार होत असल्याची माहिती आयएमडी चे माजी हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.
पुणे शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून सिंहगड रस्ता, धायरी आणि उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. शहराच्या काही भागात वादळी वारे सुटले आहे. येत्या चार दिवसांमध्ये राज्यातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज गुरुवारी (ता. 09 मे) पुणे, छ.संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, नाशिक, लातूर, परभणी, जालना, नांदेड, वर्धा, अमरावती, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच शुक्रवार (ता. 10 मे) रोजी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, लातूर, धाराशिव आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यात पुढील तीन-चार दिवसात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळेल. अनेक भागात मान्सूनप्रमाणे पावसाचा जोर पाहायला मिळेल.