Railway News : पुणे : रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. अनेकानेक लोकाभिमुख योजना राबविल्या जात आहेत. आता रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रवाशांना तातडीची वैद्यकीय मदत आता स्थानकातच उपलब्ध होणार आहे. यासाठी पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्यात येत आहे. प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशाची तब्येत अचानक बिघडल्यास त्याच्यावर तत्काळ प्रथमोपचार करून त्याला नजीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. (Railway News)
आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्यात येत आहे
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, प्रवाशांसाठी आपत्कालीन वैद्यकीय कक्ष पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस ठाण्याशेजारील जागेत उभारला जाणार आहे. हा कक्ष एकूण ५९८ चौरस फूट जागेवर उभारण्यात येणार असून, तो चालविण्याचे कंत्राट रूबी हॉल रुग्णालयाला देण्यात आले आहे. पाच वर्षांसाठी हे कंत्राट देण्यात आले आहे. (Railway News)
या कक्षाच्या माध्यमातून रेल्वेत चढताना अथवा उतरताना अथवा अन्य कारणांमुळे जखमी झालेल्या प्रवाशांवर किंवा आजारी प्रवाशांवर मोफत प्रथमोपचार केले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या दरांनुसार हे उपचार होतील. आजारी प्रवाशावर प्रथमोपचार करून आवश्यकता भासल्यास त्याला नजीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. (Railway News)
दरम्यान, आजाराचे स्वरूप लक्षात घेऊन प्रवाशाने खासगी रुग्णालयात दाखल व्हायची इच्छा व्यक्त केल्यास त्याला तेथे दाखल केले जाईल. यासाठी प्रवासी अथवा त्याच्या नातेवाईकाचे संमतीपत्र घेतले जाईल. प्रवाशाला रुग्णालयात नेण्यासाठी कक्षाकडून रुग्णवाहिका मोफत पुरविली जाईल. आपत्कालीन वैद्यकीय कक्षात औषध विक्री केंद्र सुरू करून संबंधित संस्थेला उत्पन्न मिळविता येणार आहे.
आपत्कालीन वैद्यकीय कक्ष २४ तास सुरू राहणार असून, कक्षात एक डॉक्टर, दोन परिचारिका, ईसीजी, डिफ्रिबिलेटर, नेब्युलायझर आदी सुविधा, जिवनावश्यक औषधे उपलब्ध असणार आहेत. येथे प्रथमोपचार मोफत तर इतर उपचार अल्प दरात होतील. नजीकच्या सरकारी रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका, रेल्वे प्रवाशांना आपत्कालीन वैद्यकीय मदत स्थानकावरच उपलब्ध करून देण्याचे निर्देश रेल्वे मंडळाने दिले होते. त्यानुसार, स्थानकाच्या परिसरात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्यात येत आहे. तिथे प्रवाशांना २४ तास उपचार मिळतील, असे मध्य रेल्वेचे (पुणे विभाग) जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे यांनी सांगितले. (Railway News)