बापू मुळीक
पुरंदर : पुरंदर तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूसंपादन लवकरच सुरू करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुरंदर विमानतळ ड्रीम प्रोजेक्ट असल्याने, याकडे अधिकचे लक्ष देण्यात येत आहे. प्रशासकीय पातळीवर भूसंपादनाच्या हालचालींना वेग आला आहे. प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली आहे. पुरंदर विमानतळा करिता लागणारे भूसंपादन हे महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रशासनाला आदेश दिले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमानतळाचे काम प्रलंबित राहिले होते. मात्र राज्यात आता भाजपचे सरकार आल्यानंतर या प्रकल्पाला वेग देण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात नुकतीच वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांची बैठक देखील पार पडली. राज्याच्या विशेष पुणे शहराच्या विकासासाठी या प्रकल्पाच्या महत्त्वावर भर दिला जात आहे. ही प्रक्रिया जलद करण्यासाठी सरकार एमआयडीसीसी समन्वयाने काम करत आहे.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे पुरंदर विमानतळा संदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने 2018 मध्ये पाठविला होता. पुरंदर विमानतळासाठी 1 ए ही जागा महायुती सरकारच्या काळात ठरविण्यात आली होती. त्यावेळी विमानतळाचा प्रस्ताव मंजूरही झाला होता. मात्र 2021 मध्ये महाविकास आघाडी सरकारने जागा बदलली ही जागा 5 ए अशी करण्यात आली.
त्यामुळे हा प्रस्ताव रखडला होता. या पाठोपाठ महायुती सरकारने 2023 मध्ये पुन्हा मूळ जागेचा प्रस्ताव पाठविला. आत्ताचा प्रस्तावानुसार मूळ जागीच विमानतळ उभारण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनायाने मंजुरी दिली आहे.
पुणे शहर व परिसरातील व्यवसाय वाढविण्यासाठी पुरंदर विमानतळाची गरज आहे. जगात वाहतूक व्यवस्थेला सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. जेथे वाहतूक सुधारली आहेत त्या ठिकाणी विकास झालेला पाहायला मिळतो.
रमेश इंगळे, व्यावसायिक
आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पुरंदरचा नावलौकिक होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी विमानतळ तत्काळ होणे गरजेचे आहे. याचा निश्चितपणे सर्वांना फायदा होणार आहे. त्यामुळे शासनाने हा प्रश्न मार्गी लावायलाच पाहिजे.
नवनाथ गायकवाड, नागरिक