पुणे : गेल्या काही दिवसामध्ये यूएईच्या अरबी वाळवंटात वसलेल्या दुबईमध्ये पावसाने कहर केला होता. वर्षभराचा पाऊस एकाच दिवशी कोसळावा अशी परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे. झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील विमानतळावर पाणी साचून विमानसेवा विस्कळीत झालीय. या पावसामुळे युएईमध्ये विमानतळावर पाणी जमा झालेले आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील मोठे आणि सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. मात्र पावसामुळे येथील अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. हळूहळू तेथील स्थिती पूर्वपदावर येत असली तरी त्याचा फटका पुणे-दुबई विमानसेवेला बसला आहे. पुण्याहून दुबईऐवजी जवळच्या फुजैरा शहरात विमाने वळविण्यात आली. या कारणामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
पुणे- दुबई थेट विमानसेवा आहे. ही विमानसेवा दिवसातून एक वेळा असते. येथे स्पाईसजेटकडून या मार्गावर सेवा दिली जाते. दुबई विमानतळ १९ एप्रिलला पहाटे चार वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आल्यामुळे अनेक विमाने रद्द करण्यात आली. यामुळे दुबईला जाणारी आणि तेथून उड्डाण करणारी विमाने फुजैराला वळविण्यात आली. याबाबत स्पाईसजेटने म्हटले आहे की, दुबई विमानतळावरील सेवा पावसामुळे विस्कळीत झाली असल्यामुळे मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबादहून जाणारी विमाने दुबईऐवजी फुजैराला जातील.
पुणे-दुबई आणि दुबई-पुणे या विमानसेवेसाठी १९ व २० एप्रिलला हा बदल करण्यात आलेला आहे. फुजैरा ते दुबई हे अंतर १२१ किलोमीटर आहे. दुबईला जाणाऱ्या अथवा येणाऱ्या प्रवाशांना यामुळे फुजैराला दुसऱ्या वाहनाने जाऊन विमान पकडावे लागत आहे. यामध्ये प्रवाशांचा वेळ जात असून, या प्रवासासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागत आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. लवकरच ही सेवा पूर्ववत होईल अशी चिन्हे दिसून येताहेत.
यावेळी विहार ट्रॅव्हल्सचे संचालक ऋषिकेश पुजारी म्हणाले की, दुबई विमानतळावरील सेवा विस्कळीत झाल्यामुळे मुंबईहून दुबईमार्गे जाणाऱ्या विमान सेवेला मोठा फटका बसला आहे. पुण्यातून त्याचा फारसा परिणाम झालेला नाही.