लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर बसचालक व रिक्षाचालक यांच्यात किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एचपी कंपनीसमोर सोमवारी (ता. २७) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, या हाणामारीमुळे बसमधील तब्बल ५० प्रवाशांचा दोन तासांहून अधिक काळ खोळंबा झाला.
बसचालक योगेश सिद्धेश्वर खडके (वय ३७, रा. भांडगाव, ता. दौंड) व रिक्षाचालक हसन समशेर पठाण (वय ४०, इनामदारवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी एकमेकांना हाणमारी करणाऱ्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश खडके हे स्वारगेट-लातूर बसवर चालक म्हणून काम करतात. तर हसन पठाण हे रिक्षाचालक म्हणून काम करतात. दरम्यान, खडके यांची बस कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एचपी कंपनीसमोर आली असता, हसन पठाण यांना त्यांच्या रिक्षाला पाठीमागू बसने धक्का मारल्याचा भास झाला. त्यानंतर हसन पठाण हे तातडीने रिक्षातून खाली उतरले आणि बसमध्ये घुसून बसचालक योगेश खडके यांना मारहाण केली. त्यानंतर बसचालक खडके खाली उतरले आणि रिक्षाचालक हसन पठाण यांना मारहाण केली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहनांसह दोन्ही चालकांना पोलीस ठाण्यात आणले. दोन्ही चालकांचे जबाब घेण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे करीत आहे.
प्रवाशांचा दोन तास खोळंबा
स्वारगेट-लातूर बस दैनंदिन प्रवासी फेऱ्या मारते. सोमवारी या बसमधून ५० हून अधिक प्रवासी लातूरकडे चालले होते. यादरम्यान, बसचालक व रिक्षाचालक या दोघांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत २ तास खोळंबा झाला.
हाणामारी नेमकी कशावरून?
कदमवाकवस्ती येथे रिक्षाला बसने पाठीमागून धडक दिल्याने बसचालक व रिक्षाचालक यांच्यात हाणामारी झाली. मात्र, बस आणि रिक्षाला कोणतीही हानी पोहोचली नाही. या दोन्ही वाहनांचा अपघात न झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मग अपघात झाला नसताना या दोन्ही चालकांनी एकमेकांना का हाणामारी केली, असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.