पुणे : लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे. आज पुण्यात लोकसभेसाठी मतदान होतं आहे. सहकारनगर, शिवदर्शन भागात भाजपकडून पैशांचे वाटप केले जात आहे, असा आरोप पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी रविवारी (दि. 12) रात्री केला.
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. 13) मतदान होणार आहे. पुण्यातील प्रचाराची सांगता शनिवारी (दि. 11) झाली. रविवारी रात्री शहराच्या वेगवेगळ्या भागात पैसेवाटप करण्यात आल्याचा आरोप भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परस्परांवर केला.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त तैनात असताना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. शिवदर्शन, सहकारनगर भागात मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप होत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला. त्यानंतर धंगेकर रात्री सहकारनगर पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना जाब विचारला.
पोलीस ठाण्याच्या आवारात धंगेकर आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. पैसे वाटप करण्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोपही यावेळी धंगेकर यांनी केला.