पुणे: पुणे शहर (Pune News) सध्या गुन्हेगारीच्या घटनांनी हादरत आहे. कात्रज भागातील भारती विद्यापीठ परिसरात केवळ ‘एकमेकांकडे पाहण्यावरून’ झालेल्या वादात सौरभ संजय शिखरे या २८ वर्षीय तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. अंडाभुर्जीच्या गाडीवर झालेली ही किरकोळ बाचाबाची एका कुटुंबाचा आधार हिरावून नेणारी ठरली आहे.

सौरभ घटनेच्या दिवशी रात्री आपल्या मित्रांसोबत बाहेर गेला होता. पहाटे अडीचच्या सुमारास भूक लागल्याने ते भारती विद्यापीठाच्या मागील गेटजवळील एका अंडाभुर्जीच्या गाडीवर थांबले. तिथेच आरोपी तेजस सणस आणि त्याचे मित्रही उपस्थित होते. ‘तू माझ्याकडे असं का पाहतोयस?’ या अतिशय क्षुल्लक कारणावरून दोन्ही गटात आधी शाब्दिक चकमक उडाली आणि त्याचं रूपांतर भीषण हाणामारीत झालं. आरोपींनी सौरभला इतकी बेदम मारहाण केली की, खाली पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
सौरभला त्याच्या मित्रांनी जखमी अवस्थेत घरी सोडलं होतं, मात्र सकाळी तो बेशुद्ध आढळल्याने खळबळ उडाली. नऱ्हे येथील रुग्णालयात चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर २८ डिसेंबरला त्याची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि माहितीच्या आधारे १९ वर्षीय तेजस सणसला बेड्या ठोकल्या.







