तुषार सणस
Pune News : भोर : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुले मंजूर करण्यात आली होती. पैकी काही लाभार्थ्यांना आलेल्या विविध अडचणींमुळे घरकुल बांधता आले नसल्यामुळे घरकुल रद्द करण्यात आल्याच्या नोटीस देण्यात आल्या होत्या. या संदर्भातील प्रश्न घेऊन भोंगवली ग्रामस्थ आमदार संग्राम थोपटे यांच्याकडे गेले. आमदार थोपटे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) सहआयुक्तांना संपर्क साधत जे लाभार्थी तीन महिन्यांत घर बांधण्यास इच्छुक आहेत, अशा घरकुल लाभधारकांना तीन महिने मुदतवाढ देण्यात यावी अशी सूचना केली. यामुळे लाभधारकांनी समाधान व्यक्त केले. (Pune News)
तीन महिने मुदतवाढ
या वेळी आमदार थोपटे यांनी, ज्या व्यक्तींना घरकुल बांधायचे आहे, त्यांनी पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सह आयुक्त आकुर्डी, पुणे यांच्या नावे लेखी विनंती अर्ज करून घरकुल बांधण्यासाठी तीन महिने मुदतवाढ मिळवून आपल्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे आवाहन केले. (Pune News)
आमदारांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मुदतवाढ मिळाल्याने आणि भोंगवली फाटा ते माहूर खिंडीपर्यंतच्या रस्त्यासाठी चार कोटी निधी दिल्याबद्दल थोपटे यांचा सत्कार करत आभार मानले. या वेळी भोर पंचायत समितीचे उपसभापती रोहन बाठे, भोंगवली गावचे सरपंच अरुण पवार, भगवान भांडे, शेखर शेटे, महादेव शेडगे, अंकुश चव्हाण, अर्जुन सुर्वे, धनंजय शेटे, उत्तम शेडगे व ग्रामस्थ उपस्थित होते.