पुणे: राज्याचे खंबीर नेतृत्व आणि पुण्याचे पालकमंत्री (Pune News) अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल असताना, पुणे महानगरपालिकेने आपल्या वर्धापन दिनानिमित्त ‘सांस्कृतिक महोत्सवा’चा घाट घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. ज्या नेत्याने पुण्याच्या विकासासाठी आयुष्य वेचले, त्यांच्याच शहरात प्रशासनाने दाखवलेली ही असंवेदनशीलता पाहून पुणेकरांमधून संताप व्यक्त झाला. अखेर, टीकेची झोड उठल्यानंतर महापालिकेला जाग आली असून सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

15 फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेचा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने प्रशासनाने वैयक्तिक आणि समूह नृत्य, नाटके, हिंदी-मराठी गाण्यांचे ऑर्केस्ट्रा असे जंगी कार्यक्रम आयोजित केले होते. अजितदादांसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या निधनाला काही दिवसही उलटले नसताना अशा जल्लोषाचे आयोजन करणे, ही प्रशासकीय चूक असल्याची भावना जनमानसात उमटली.

अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री म्हणून अनेक वर्षे शहराच्या नियोजनात सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्या निधनानंतर शासकीय दुखवटा पाळणे अपेक्षित असताना, महापालिकेने मात्र उत्सवाच्या तयारीला प्राधान्य दिले. दरम्यान, अखेर कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.







