पुणे: अजित पवार यांच्या विमान अपघाताला (Ajit Pawar Plane Crash) आता 10 दिवस उलटले असले, तरी या घटनेभोवतीचे प्रश्न आणि संशय अधिकच गडद होत चालले आहेत. 28 जानेवारी (Ajit Pawar Death) रोजी बारामतीजवळ झालेल्या या अपघाताबाबत सुरुवातीपासूनच तो अपघात होता की घातपात, यावर चर्चा सुरू आहे. आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी गंभीर आणि खळबळजनक दावे करत चौकशीची मागणी केली आहे. (Breaking News)

बजरंग सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अजित पवार यांच्या विमान अपघाताचे दोन व्हिडिओ समोर आले असून त्यामध्ये विमानाचा दोन वेळा स्फोट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा केवळ तांत्रिक अपघात होता का, की विमानामध्ये बॉम्ब होता, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, घातपात आणि अपघात या दोन्ही शक्यतांचा तपास झाला पाहिजे आणि या प्रकरणातील सर्व सीसीटीव्ही फुटेज जनतेसमोर आणली पाहिजेत.

सोनवणे यांनी पुढे मागणी केली की, अजित पवार देवगिरीवरून किती वाजता निघाले, विमानतळावर कधी पोहोचले, विमानात कधी बसले याचे सर्व सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्यात यावे. तसेच या अपघाताचा ब्लॅक बॉक्स लपवून न ठेवता तोही सार्वजनिक करावा, जेणेकरून सत्य समोर येईल. सुरुवातीला विमानात सहा जण असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र नंतर पाच मृतदेह सापडले. मग सहावा व्यक्ती नेमका कुठे गेला, हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला जात होते. बारामतीमध्ये त्यांच्या चार सभा नियोजित होत्या. सकाळी पावणे नऊच्या सुमारास बारामती विमानतळाजवळ त्यांचे खासगी विमान कोसळले. अपघातानंतर विमानाचे तुकडे झाले असून या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला. या अपघाताची चौकशी सुरू असली, तरी आता राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या गंभीर आरोपांमुळे आणि मागण्यांमुळे या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.







