पुणे, ता. 28: राज्यात (Pune News) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी निकालाची घोषणा होणार आहे. नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत पात्र मतदारांना मतदान करता यावे, याकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी-उरळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, माळेगाव बुद्रुक, मंचर, राजगुरुनगर, सासवड, शिरूर, तळेगाव दाभाडे व वडगाव मतदारसंघांत सुट्टी राहणार आहे.
दरम्यान, केंद्र व निमशासकीय कार्यालये, बँका यांनाही सुट्टी लागू असून पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामाकरिता त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर आहेत त्या मतदारांना देखील सुट्टी लागू राहणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.







