Pune News : पुणे : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री बाई फुले यांच्याविषयी समग्र लिखाण करणारे, ज्येष्ठ विचारवंत, संशोधक आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रा. नरके यांना साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला. (Pune News)
अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रा. नरके यांना साश्रुनयनांनी निरोप
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित आहेत. भुजबळ यांनी हरी नरके यांच्या पत्नी संगिता नरके, कन्या प्रमिती नरके, भाऊ लक्ष्मण नरके, ईश्वर नरके, दत्तात्रय नरके, सुदाम नरके आणि पुतणे विष्णू नरके यांच सांत्वन केले. या वेळी आमदार कपिल पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार उल्हास पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (Pune News)
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींच्या प्रश्नावर नरके यांचा गाढा अभ्यास होता. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसी प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरले. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य तसेच भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर त्यांनी उल्लेखनीय काम केले. मराठी भाषेला अभिजात भारतीय भाषेचा दर्जा मिळावा यासाठी नेमलेल्या प्रा. रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी विशेष योगदान दिले. महाराष्ट्र शासनाचा समग्र महात्मा फुले नावाचा एक हजार पानांचा अद्यावत ग्रंथाचे संपादक म्हणून प्रा. नरके यांनी काम पाहिले. राज्य शासनाच्या वतीने प्रकाशित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र वाङमयाच्या २६ खंडांपैकी सहा खंडाचे संपादन हरी नरके यांनी केले. महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्य, संशोधन, आणि महात्मा फुले–शोधाच्या नव्या वाटा ही त्यांची दोन पुस्तके विशेष लोकप्रिय झाली. त्यांच्या निधनाने महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, या घटनेनंतर सोशल मीडियावर हरी नरके यांच्या उपचाराबाबत मेसेज व्हायरल झाले. ते मेसेज मला देखील हरी नरके यांनी केले होते. त्याच दरम्यान आपल्या येथील डॉक्टरांकडे हरी नरके यांच्यावर उपचार सुरू केले होते. ५० डॉक्टर त्यांना येऊन बघत होते आणि त्याला वर्ष झाले. त्यामुळे मी त्यावर जास्त बोलणार नाही. पण जामनगरमध्ये जाऊन २० किलो वजन घटले तिथेच मला शंका आली होती. अशी कुठली औषध दिले त्यांना की २० दिवसात २० किलो वजन कमी झाले, असा सवाल देखील या वेळी त्यांनी उपस्थित केला. (Pune News)
दरम्यान, हरी नरके हे शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरेचे रहिवासी असल्याने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आम्हाला मोठा अभिमान होता. शिरूर तालुक्यात सांस्कृतिक चळवळ रुजावी यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न आमच्यासाठी प्रेरणादायी होता. बहुजन समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी आयुष्यभर झटलेलं हे व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेल्याने समाजाची मोठी हानी झाली आहे, अशी भावनाशील प्रतिक्रिया आमदार अशोक पवार यांनी दिली. (Pune News)
शिरूर तालुक्यात सांस्कृतिक चळवळ रुजावी यासाठी प्राध्यापक नरके यांनी, आईच्या नावाने ‘सोनाई स्मृती व्याख्यानमाला’ गेल्या दहा ते बारा वर्षांपासून सुरू केली होती. दरवर्षी होणाऱ्या या व्याख्यानमालेत राज्यातील अनेक नामवंत विचारवंत साहित्यिकांनी विचार मांडले.