पुणे: पुण्यातील खराडी बायपास ते मुंढवा रस्त्यावर रविवारी रात्री ९ च्या सुमारास एक विचित्र घटना घडली. वीज वितरण कंपनीचा एक मोठा ट्रान्सफॉर्मर घेऊन जाणारा ट्रक या मार्गावरून जात असताना, ट्रान्सफॉर्मरमधून तेलाची गळती झाली. ही गळती जवळपास 2 किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यावर पसरली, रस्त्यावर सांडलेल्या तेलामुळे अनेक दुचाकी वाहने घसरू लागली. या विचित्र घटनेमध्ये एकूण 12 दुचाकीस्वार जखमी झाले.

अपघात आणि वाहतूक कोंडीची माहिती मिळताच खराडी अग्निशमन दलाची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
येरवड्याचे उप अग्निशमन दलाचे अक्षय राऊत, दत्तात्रय सातव, सुनील टेगळे, आणि चेतन डुमे यांसारख्या अनेक जवानांनी मोलाची भूमिका बजावली. अपघातग्रस्त मार्गावर पसरलेल्या तेलावर लाकडी भुसा आणि माती टाकून रस्ता सुरक्षित केला. अग्निशमन दलाच्या या तत्पर कार्यामुळे मोठी वाहतूक कोंडी आणि आणखी अपघात टळले. केवळ एका तासात मोठा धोका दूर केला आणि वाहतूक पूर्ववत केली.







