पुणे : बारामतीमध्ये कौटुंबिक वादातून पतीचा जीव घेण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने पतीला बेशुद्ध केल्यानंतर त्याला घरातील एका सिमेंटच्या कट्ट्यात कोंडून त्यांना जिवंत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीमुळे वेळीच कारवाई झाली आणि संबंधित व्यक्तीचा जीव वाचला.

ही घटना बारामती शहरातील जामदार रोड परिसरातील इंद्रप्रस्थ सोसायटीमध्ये घडल्याचे समोर आले आहे. प्रवीण जगताप (वय 41) आणि त्यांची पत्नी शर्मिला जगताप (वय 38) यांच्यात काही काळापासून कौटुंबिक कारणावरून वाद सुरू असल्याची माहिती आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 30 जुलैच्या रात्री प्रवीण यांना पत्नीनेऔषध दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर ते बेशुद्ध झाल्यावर त्यांना घराच्या गॅलरीलगत असलेल्या सिमेंटच्या कट्ट्यात कोंडून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा सिमेंटचा कट्टा आधीच तयार करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यावर फरशी लावून तो पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, प्रवीण यांना अशा प्रकारे कोंडण्यात आल्याची माहिती एका व्यक्तीने पोलिसांना दिली होती. माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांनी वेळ न दवडता संबंधित घर गाठले. पोलिसांनी कट्ट्यावरील फरशी हटवून पाहणी केली असता आत प्रवीण बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय देखरेख सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी प्रवीण यांचे वडील प्रकाश कान्होबा जगताप (वय 71, रा. ढाकाळे) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनंतर शर्मिला जगताप यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू असून, पतीला बेशुद्ध करण्यासाठी नेमकं कोणतं औषध देण्यात आलं आणि कट्टा तयार करण्यामागील उद्देश काय होता, याचाही तपास केला जात आहे.







