न्हावरे: रशियातील (Pune News) बस्कर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, उफा येथे ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेत असलेल्या आंबळे (ता.शिरूर) येथील प्रज्वल दादासाहेब खेसे (वय 22) या तरुणाचा अस्थम्याच्या झटक्याने शुक्रवारी (दि.26 सप्टेंबर) दुर्दैवी मृत्यू झाला.

मात्र, रशियातून मृतदेह भारतात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तब्बल दहा दिवसांचा कालावधी लागला.अखेर सोमवारी (ता.6) रात्री उशिरा प्रज्वलचा मृतदेह दिल्ली विमानतळावर आणण्यात आला. त्यानंतर आज (ता.7) मंगळवारी सकाळी नऊ वाजता आंबळे परिसरातील अनोसेवाडी, रानमळा येथे प्रज्वलवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आपल्या एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाल्याचा जबर धक्का प्रज्वलच्या आई-वडिलांना बसला असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रज्वल खेसे हा परिसरात सर्वांचा लाडका, मनमिळाऊ व अभ्यासात अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. बारावीनंतर त्याने डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रशियातील बस्कर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, उफा येथे प्रवेश घेतला होता. त्याच्या अकाली जाण्याने गावात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रज्वलच्या पश्चात प्राथमिक शाळेत शिक्षक असलेले वडील, गृहिणी आई आणि एक लहान बहिण असा परिवार आहे.







