पुणे: पुण्यातील मुंढवा जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीचे नाव आल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आगामी महापालिका निवडणुका नजरेसमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) ला दणका देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही खेळी खेळल्याचे अंदाज माध्यमांकडून बांधले जात आहेत.

या सर्व चर्चांवर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पडदा टाकला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, हे प्रकरण निवडणुकीमुळे बाहेर आलेले नाही, तर ते ‘रूटीनमध्ये’ समोर आले आहे. महापालिका निवडणुकांशी या प्रकरणाचा कसलाही संबंध नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी ठामपणे सांगितले.
‘भ्रष्टाचाराला मुख्यमंत्री सहन करत नाहीत’
माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “सूर्याला जे दिसत नाही ते पत्रकाराला दिसतं. कालपासून पत्रकारांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाला धक्का देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मोठी खेळी खेळली, असा जो अंदाज लावला आहे, तसे काही नाहीये.”
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्याही भ्रष्टाचाराला सहन करत नाहीत. म्हणून त्यांनी तातडीने संबंधित तहसीलदाराला निलंबित केले आहे. “रूटीनमध्ये एखादा विषय समोर आला आहे. परंतु चौकशी व्हायची बाकी आहे. त्यामुळे, यात खरं काय आहे, हे सगळं लवकरच समोर येईल. या सगळ्या प्रकरणाचा महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने कसलाही संबंध नाही,” असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच, या प्रकरणाचा तपास मोठ्या वेगाने सुरू आहे. मोठे अधिकारी या प्रकरणाची चौकशी सुरु असून, कोणाकोणावर गुन्हा दाखल होणार आणि कोणत्या गोष्टी समोर येणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.







