शिरूर: पुणे-नाशिक महामार्गावर बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या शिरूर येथील नागरिकांनी मोठा एल्गार पुकारला. बिबट्याने अवघ्या 20 दिवसांत 3 जणांचा जीव घेतल्यामुळे नागरिक रस्त्यावर उतरले. बिबट्यांच्या हल्ल्यांना रोखण्यात वन विभागाच्या अपयशामुळे संतप्त नागरिकांनी मंचर येथे तब्बल 22 तास महामार्ग रोखला, ज्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली.

अवघ्या 20 दिवसांत 3 जणांचा जीव घेतल्यामुळे आंदोलकांनी महामार्ग रोखून तीव्र आंदोलन केले. बिबट्यामुक्त परिसर व्हावा आणि वन विभागाने त्वरित ठोस उपाययोजना करावी, ही आक्रमक नागरिकांची प्रमुख मागणी होती.
या 22 तासांच्या रास्तारोको आंदोलनानंतर मंचर पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी देवदत्त निकम, सुरेश भोर, अरुण गिरे यांच्यासह एकूण 250 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक कार्यात अडथळा निर्माण करणे, बेकायदेशीररित्या जमाव जमवणे आणि महामार्ग रोखणे अशा विविध कलमांखाली मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नागरिकांचा संताप आणि पोलिसांची कारवाई, या दोन्हीमुळे शिरूर परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.







