मुंबई: राज्य सरकारने मंगळवारी रात्री उशिरा 10 वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढत प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. हे फेरबदल केवळ नियमित बदल्या नसून, आगामी निवडणुका आणि प्रलंबित प्रकल्पांची गती पाहता सरकारने केलेली ही एक महत्त्वाची ‘फिल्डिंग’ मानली जात आहे. अश्विनी भिडे या मेट्रो प्रकल्पांमधील त्यांच्या यशस्वी कामगिरीसाठी ओळखल्या जातात. आता मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची धुरा त्यांच्याकडे सोपवून सरकारने मुंबईतील पायाभूत सुविधांचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचा मानस स्पष्ट केला आहे.

दुसरीकडे, लोकेश चंद्र यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून झालेली वर्णी ही मुख्यमंत्री सचिवालयाला अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. प्रशासनावर पकड असलेले लोकेश चंद्र आता मुख्यमंत्र्यांच्या ‘कोअर टीम’चे मुख्य दुवा असतील.
आपल्या कडक कार्यपद्धतीमुळे नेहमीच चर्चेत राहणारे तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. दिव्यांग कल्याण विभागातून आता त्यांची रवानगी आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागात करण्यात आली आहे. नियमांवर बोट ठेवून काम करण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे त्यांना एका जागी फार काळ टिकू दिले जात नाही, अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात पुन्हा सुरू झाली आहे.
प्रशासकीय कामाचा गाडा सुरळीत चालवण्यासाठी विकास चंद्र रस्तोगी यांच्याकडे वित्तीय सुधारणांची जबाबदारी देण्यात आली आहे, तर परिमल सिंह आता कृषी विभागाचे सचिव म्हणून काम पाहतील. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांना बढती देत वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त केले आहे. हा बदल वाढत्या शहरीकरणाची आव्हाने पेलण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.
येथे मंगळवारी जाहीर झालेल्या सर्व 10 आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांची सविस्तर यादी आणि त्यांच्या नवीन जबाबदाऱ्यांची माहिती दिली आहे:
प्रशासकीय बदल्यांची संपूर्ण यादी:
लोकेश चंद्र (IAS:1993): आधी ‘महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी’ (MSEDCL) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. आता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव (मुंबई) या अत्यंत महत्त्वाच्या पदावर करण्यात आली आहे.
अश्विनी भिडे (IAS:1995): यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव होत्या. आता त्यांच्याकडे मुंबई महानगरपालिका आयुक्त (BMC Commissioner) या पदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे (IAS:2005): दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांची आता सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग या पदावर बदली करण्यात आली आहे.
विकास चंद्र रस्तोगी (IAS:1995): कृषी आणि पशुसंवर्धन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांची बदली आता अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा), वित्त विभाग या पदावर झाली आहे.
विनिता वैद्य सिंघल (IAS:1996): यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाचा पदभार होता. आता त्यांची नियुक्ती प्रधान सचिव, मृद व जलसंधारण विभाग म्हणून करण्यात आली आहे.
परिमल सिंह (IAS:2004): ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे’ (POCRA) संचालक होते. आता त्यांची सचिव (कृषी), कृषी व पशुसंवर्धन विभाग म्हणून बदली झाली आहे.
तुकाराम मुंढे (IAS:2005): दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांची आता सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग या पदावर बदली करण्यात आली आहे.
प्रेरणा देशभ्रतार (IAS:2010): राज्य कर विभागात सह-आयुक्त होत्या. आता त्या आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग (मुंबई) म्हणून पदभार स्वीकारतील.
माणिक गुरसळ (IAS:2009): तुकाराम मुंढे यांच्या जागी आता माणिक गुरसळ यांची सचिव, दिव्यांग कल्याण विभाग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
लहू माळी (IAS:2009): यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प (मुंबई) या पदावर करण्यात आली आहे.
पृथ्वीराज बी.पी. (IAS:2014): पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांना आता आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका म्हणून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.







