पुणे: स्वप्नवत वाटणाऱ्या (Pune News) पुरंदर विमानतळाच्या नावाचा वापर आता गुन्हेगार फसवणुकीसाठी करू लागले आहेत. विमानतळाच्या कामासाठी जेसीबी आणि ट्रॅक्टर भाड्याने हवेत, असे सांगून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा सुपा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ७७ लाख रुपये किमतीची ५ वाहने जप्त केली असून निलेश थोरात या मुख्य सूत्रधाराला बेड्या ठोकल्या आहेत.

पुरंदर येथे विमानतळाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची बतावणी या टोळीने केली होती. त्यांनी नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गाठले. ‘बी.जी. कन्स्ट्रक्शन’ या नावाने बनावट कागदपत्रे आणि १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर रीतसर करारनामा करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. “तुमच्या जेसीबीला दरमहा १ लाख रुपये भाडे देऊ,” असे मोठे आमिष त्यांनी दाखवले. एकदा का वाहन ताब्यात आले की, ही टोळी ते परस्पर तिसऱ्यालाच विकून गायब होत असे.
बालाजी गादेवाड या शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर सुपा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. निलेश थोरात याच्या मुसक्या आवळल्यानंतर तपासात धक्कादायक माहिती समोर आली. या टोळीने केवळ विमानतळाच्या नावाखालीच नव्हे, तर ‘फायनान्स कंपनीचे जप्त केलेले ट्रॅक्टर आहेत’ असे सांगून शिरूर भागातील शेतकऱ्यांनाही स्वस्तात वाहने विकून गंडा घातला आहे. पोलिसांनी आतापर्यंत ३ जेसीबी आणि २ ट्रॅक्टर हस्तगत केले आहेत. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३८, ३३६, ३९८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अजय चव्हाण, दिनेश मोरे आणि तुषार शिंदे या अन्य आरोपींचाही समावेश असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.







