Pune-Mumbai Highway : पुणे : पुणे आणि मुंबई या दोन मोठ्या शहरांमधील वाहतुकीचा ( Mumbai Pune Traffic) ताण कमी करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नेरळ ते शिरूर या मार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता, त्याला आता यश आले आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुन्या महामार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. फेब्रुवारी महिन्यात आडोशी बोगद्याजवळ झालेल्या टँकर अपघातामुळे एक्स्प्रेस वे सुमारे 32 तास बंद राहिला होता. त्या वेळी पर्यायी मार्ग नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. ही समस्या लक्षात घेऊन नव्या मार्गाची गरज अधोरेखित करण्यात आली होती.
प्रस्तावित मार्ग उरण, कर्जत, नेरळ, वांद्रे, पाईट, शिरोली, पाबळ, मलठण मार्गे शिरूरपर्यंत असणार आहे. या मार्गामुळे माळशेज घाट आणि बोरघाट यांच्या दरम्यान सुमारे 60 किलोमीटर अंतरात एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. यामुळे वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होईल.
या प्रकल्पामुळे तळेगाव, चाकण आणि शिक्रापूर या औद्योगिक भागांतील वाहतूक कोंडी कमी होईल. उद्योगांसाठी मालाची ने-आण जलद होणार आहे. तसेच हा मार्ग मुंबई ते छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई ते सोलापूर या शहरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरेल.
या प्रकल्पातील एक विशेष बाब म्हणजे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सुमारे 20 किलोमीटर लांबीचा नवीन घाटमार्ग तयार केला जाणार आहे. यासाठी पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे-मुंबई प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे.







