पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मेट्रोसह विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांवर भर दिला जात आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या भविष्यातील विकासाचे नियोजन मांडले. पुढील 4 वर्षांत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनेक प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते आणि आता त्याचे लोकार्पणही त्यांच्याच हस्ते होत आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) पद्धतीने उभारण्यात आलेला हा प्रकल्प पुण्यातील महत्त्वाचा उपक्रम आहे. टाटा सन्स आणि सिमेन्स या कंपन्यांच्या सहकार्याने मेट्रोचे काम पूर्ण करण्यात आले असून, यासाठी केंद्र सरकारचेही सहकार्य मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर आयटी कंपन्या असल्याने दररोज हजारो कर्मचारी या भागात ये-जा करतात. मात्र, वाहतूक कोंडीमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवास अधिक सोयीचा होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ही पिंक लाईन पूर्णपणे महिला संचलित असेल, असेही त्यांनी सांगितले.

मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात मेट्रोचे जाळे विस्तारत असून, महाराष्ट्रातील 12 नगरपालिका क्षेत्रांमध्ये मेट्रोची कामे सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि त्याभोवती नवी आर्थिक व्यवस्था विकसित होईल, असेही ते म्हणाले.

केंद्र सरकारकडून मिळालेल्या 5 हजार कोटी रुपयांच्या निधीचा उल्लेख करत त्यांनी 2030 पर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसराला आधुनिक वाहतूक व्यवस्थेचे केंद्र बनवण्याचे लक्ष्य असल्याचे स्पष्ट केले. विविध प्रकल्पांचे जाळे तयार झाल्यानंतर नागरिकांना शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाणे अधिक सोपे होईल. पुणे केवळ आयटी आणि औद्योगिक केंद्र न राहता तंत्रज्ञानाचेही महत्त्वाचे केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.







