पुणे : महाराष्ट्रात (Maharashtra) पूर्वमोसमी पावसाच्या (Rain) सरी कोसळत आहेत. सध्या कमाल तापमानाचा चढ-उतार सुरुच आहे. पुणे जिल्ह्यासह सातारा, लातूर आणि नांदेड येथील काही भागांत आज रविवारी (ता.12) गारपिटी (Hail) अन् वादळी पाऊस (stormy rain) होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वादळी पावसासह तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा (ऑरंज अलर्ट) देण्यात आला आहे.
शहरात सोमवारी (ता.13) लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) मतदान होणार आहे. त्या दिवशी आकाश अंशत: ढगाळ राहून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागाला वळिवाच्या पावसाने तडाखा दिला आहे. त्यामुळे आज रविवारी (ता.12) पावसाच्या सरी बरसतील. या पावसाळी वातावरणामुळे उन्हाच्या चटक्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
राज्यात वळिवाच्या पावसाला सुरवात झाली असून आज राज्यात वादळी वा-यासह पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
पुणे, सातारा, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा (ऑरंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, ठाणे, सोलापूर, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.