Pune Crime: भोर/नसरापूर : नसरापूर परिसरात मंगळवारी (दि. 25) सकाळी घडलेली थरारक घटना संपूर्ण भोर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण करणारी ठरली. भरधाव वेगाने दुचाकी चालवत नागरिकांना शिवीगाळ करणाऱ्या आणि दोन शस्त्रे हवेत फिरवत दहशत माजवणाऱ्या एका हिंसक तरुणाला राजगड पोलिसांनी अत्यंत धाडसाने पकडत परिसरातील नागरिकांचा जीव वाचवला.

स्वप्निल विजय जाधव (रा. कळवा नवी मुंबई, सध्या रा. जांभळी, भोर) असे दहशत निर्माण करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. तो चेलाडी–नसरापूर रोडवर बेफाम वेगाने दुचाकी (MH 04 JW 0847) चालवत होता. तेव्हा मल्हार गॅरेजमध्ये असलेल्या फिर्यादी राहुल अंकुश खुटवड यांनी रस्त्यावर शाळकरी विद्यार्थी व नागरिकांची वर्दळ असल्याचे सांगत वाहन हळू चालवण्याची समज दिली. एवढ्याशा बोलण्यावरून संतापलेल्या स्वप्निलने अचानक कोयता व सतूर काढून हवेत फिरवू लागला.
त्याने फिर्यादी राहुल यांच्यावर शिवीगाळ, दमदाटी करत प्रत्यक्ष मारहाण केली. दोन धारदार शस्त्रे हातात घेऊन त्याने परिसरात पळापळ घडवून आणली. अचानक झालेल्या या हिंसक संतापामुळे नसरापूरमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोणत्याही क्षणी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
फिर्यादीने आरडाओरड करत मदत मागितल्यावर लिंबाजी कोळपे, काळूराम रसाळ, अक्षय खंडाळकर, तेजस खुटवड आणि चंद्रकांत लांडे यांनी एकत्र येऊन स्वप्निलला पकडून धरले. मात्र त्याच्याकडे दोन तीक्ष्ण शस्त्रे असल्याने परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली होती. दरम्यान या नागरिकांच्या मदतीने आरोपीला नियंत्रणात ठेवण्यात आले आणि तोपर्यंत परिसरातील तणाव वाढू नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले.
अहवाल मिळताच राजगड पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्या वेळी आरोपीकडे दोन्ही धारदार शस्त्रे असल्याने परिस्थिती अत्यंत संवेदनशील होती. त्याच वेळी एपीआय तुकाराम राठोड आणि पोहवा मंगेश कुंभार यांनी कोणतीही भीती न बाळगता थेट आरोपीकडे झेप घेतली. त्यांनी हातचलाखीने दोन्ही शस्त्रे हिसकावून घेत आरोपीला घट्ट पकडले आणि सुरक्षित ताब्यात घेतले.
या धाडसी कारवाईनंतर आरोपीला पोलीस स्टेशनला आणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान दुचाकी व दोन्ही शस्त्रे – एक कोयता व एक सतूर – जप्त करण्यात आली आहेत.
प्राथमिक चौकशीत स्वप्निल जाधव हा पूर्वीपासून गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून मुंबई परिसरात त्याच्यावर दोन सराईत गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नसरापूरमध्ये त्याने निर्माण केलेली दहशत ही साधी भांडणावादी कृती नसून थेट समाजाला धोका देणारी ठरते.
या संपूर्ण प्रकरणात राजगड पोलिसांच्या पथकाने दाखवलेली तत्परता आणि विशेषतः API तुकाराम राठोड व पोहवा मंगेश कुंभार यांनी जीवाची पर्वा न करता दाखवलेले धाडस आज परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे. नागरिकांनीही या अधिकारीद्वयीचे मनापासून अभिनंदन केले आहे.
नसरापूरमध्ये झालेल्या या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले की संकटाच्या क्षणी पोलिसांची उपस्थिती, धाडस आणि तातडीची कारवाईच असंख्य जीव वाचवू शकते. राजगड पोलिसांनी केलेली ही कारवाई आज परिसरासाठी अभिमानाची ठरली आहे.






