पुणे : पुणे आणि शिरुर लोकसभा निवडणुकीचे मतदान आज सोमवारी सुरु झाले. यावेळी अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचे प्रकार उघड झाले. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावावर बोगस मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वत: अरविंद शिंदे यांनी हा आरोप केला आहे.
सेंट मीराज् स्कूलमध्ये सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मतदानासाठी गेल्यानंतर त्यांच्या नावावर मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्या नावावर कोणीतरी अज्ञात व्यक्ती मतदान करून गेल्याचा प्रकार उघडकीस आला. परंतु तरीही शिंदे यांना टेंडर व्होट अंतर्गत मतदान करण्याची संधी दिली गेली. निवडणूक आयोगाच्या नियम 42 अंतर्गत टेंडर मतदान करता येते. परंतु त्याची गणना आपत्कालीन परिस्थितीत केली जाऊ शकते.
यावेळी बोलताना काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, “मी सकाळी 11 ते 12 दरम्यान सेंट मीराज् स्कूल मध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलो होतो. त्यावेळी पोलिंग बूथच्या रजिस्टरमध्ये माझ्या नावावर कोणीतरी मतदान केल्याचा प्रकार उघडकीस आला. या संदर्भात मी संबंधित अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे. दरम्यान टेंडर व्होट सुविधेअंतर्गत मला मतदान करण्याची संधी दिली गेली आहे. परंतु त्या मताची गणना केली जाईल की नाही याबाबत शंका आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांना भेटणार आहे.”
याबरोबरच पुण्यातील शिरुरमधून देखील असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघांतील राजरुगुनगर शहरात मतदान होत अल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.