पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातून निघून गेलेल्या एका महिलेचा मृतदेह पाण्याच्या टँकरमध्ये आढळून आल्याची घटना उघकीस आली आहे. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ पाणी सोडत असताना हा प्रकार समोर आला. थेट पाण्याच्या टँकरमध्ये मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा नेमका खून आहे की आत्महत्या? याबाबत मात्र पोलिसांकडून तपास केला जात आहे.
कौशल्या मुकेश चव्हाण (वय २५, रा. दुगड चाळ, जेएसपीएम कॉलेज जवळ, हांडेवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात ही महिला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम नरेंद्र ससाणे (वय २७, रा. दुगड चाळ, हांडेवाडी) यांचा पाण्याचा टँकरचा व्यवसाय आहे. बुधवारी दिवसभर पुण्याच्या विविध ठिकाणी टँकरने पाणी पोचवल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांनी घराजवळ टँकर उभा केला. त्यानंतर ते घरी गेले.
गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी टँकर बाहेर काढला. त्यानंतर त्यांनी रामटेकडी येथे पाणी भरल्यानंतर ते टँकर घेऊन फुरसूंगी येथील पॉवर हाऊसजवळ असलेल्या एका घरी पाणी पोचवण्याकरिता गेले. तेथे टाकीत पाणी सोडत असताना पाणीच बाहेर येत नव्हते. त्यामुळे त्यांनी सुरुवातील वॉल्व्ह तपासला. तरी देखील पाणी येत नसल्याने त्यांनी पाईप काढून पाहिला असता आतून साडी आल्याचे त्यांना दिसले. साडी कुठून आली हे पाहण्यासाठी ते टँकरवर चढले. टँकरचे झाकण उघडून पाहिले असता आतमध्ये कौशल्या यांचा मृतदेह पाण्यामध्ये आढळून आला. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती कळवली. हडपसर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढला. तसेच पंचनामा करीत हा मृतदेह ससून रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठवून दिला आहे.
महिलेचा मृतदेह टँकरमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. ही महिला नेमकी कोणत्या कारणामुळे घरामधून गायब झाली होती यांचा शोध घेतला जात आहे. तसेच, हा खून आहे की आत्महत्या याबाबत खुलासा झाला नसून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर ते स्पष्ट होऊ शकेल असे निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितले.