पुणे : पुणे विमानतळावर मोठा अपघात झाला आहे. पुण्याहून एअर इंडियाच्या विमानाने 160 प्रवासी दिल्लीला निघाले होते. विमान दिल्लीसाठी निघणार होते तितक्यात अचानक मोठा आवाज आला. विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये घबराहट निर्माण झाली. पुणे विमानतळावरुन दिल्लीकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला ‘पुश बॅक टग’ (विमान ओढणे किंवा ढकलण्याचे वाहन) वाहनाची धडक बसल्याने अपघात झाले. या अपघातामध्ये विमानाचे मोठे नुकसान झाले आहे.
एअर इंडिया फ्लाईट क्रमांक AI 858 गुरुवारी दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी दिल्लीसाठी जाणार होती. एरोब्रिजला जोडलेले हे विमान प्रवासी बसल्यावर बाजूला झाले. त्याचवेळी अचानक पुशबॅक टगची मोठी धडक विमानाच्या खालच्या बाजूस लागल्याने विमानाचा पत्रा कापला गेला. विमानाच्या खालच्या बाजूस फ्युजलाज मध्ये मोठे भगदाड पडले होते. तसेच विमानाच्या पंख्यांच्या पत्र्याचे देखील नुकसान झाले.
या अपघातामुळे एअर इंडियाला हे उड्डाण रद्द करावे लागले. पण दिल्लीला जाणारे हे विमान रद्द केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी वैंमानिकांनी आणि तांत्रिक टीमने विमानाचे निरीक्षण केले. त्यावेळी त्यांना विमानाच्या पंखांचे देखील नुकसान झाल्याचे दिसून आले.