Pune Accident: लोणी काळभोर, ता. 28 : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने चाललेल्या एसटी बसने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शिवशक्ती कॉर्नरजवळ बुधवारी (ता.26) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात (Accident) चौघेजण जखमी झाले आहेत तर रिक्षाचा जागीच चक्काचूर झाला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसटी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Accident

हेही वाचा- पुण्यातील मोक्का आरोपी कुख्यात गुंड गजा मारणेला जामीन मंजूर; कोर्टात नेमकं काय घडलं?
नितीन नागोराव चंदनशिव (वय 40, पत्ता वायकर वस्ती, सोरतापवाडी ता. हवेली जि. पुणे), सज्जाद इलीयास (वय 30), मोहम्मद अकबर सागीर (वय 23) व मोहम्मद इलीयाज शहजाद (वय 35, सर्व रा. जुना बाजार पुणे) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर याप्रकरणी एसटीबस चालक किरण रावण दुवे (वय 35, पत्ता आंबेगाव, काबन सांगवी ता. चाकुर जि.लातूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन चंदनशिव हे एक रिक्षाचालक असून हडपसर ते उरुळी कांचन यादरम्यान प्रवासी वाहतूक करतात. चंदनशिव हे बजाज मॅक्झीमा कंपनीच्या ऑटो रिक्षामधुन (क्रमांक एम.एच. 12 एक्स. एन. 9237) कुंजीरवाडी येथुन प्रवासी घेवून हडपसरच्या दिशेने चालले होते.
पुणे सोलापूर महामार्गावरून जात असताना, त्यांची रिक्षा लोणी काळभोर येथील शिवशक्ती कॉर्नरजवळ आली. तेव्हा त्यांच्या रिक्षाला एसटी बसने पाठीमागून जोरदार धडक मारली. या अपघातात ऑटो रिक्षा मध्ये बसलेले प्रवासी व फिर्यादी चंदनशिव हे जखमी झाले आहेत. तर रिक्षाचा जाग्यावरच चक्काचूर झाला आहे.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, पोलीस हवालदार मंगेश नानापुरे, पोलीस अंमलदार बालाजी बांगर व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना त्वरित उपचारासाठी दवाखान्यात पाठवले. व घटनास्थळी झालेली वाहतूककोंडी सुरळीत करून महामार्ग मोकळा केला.
या अपघातामध्ये फिर्यादी चंदनशिव यांचा उजव्या गुडघ्याला, उजव्या हाताचे बोटाला व कोपऱ्याला मार लागुन जखम झाली आहे. तर अॅटो रिक्षा मधील प्रवाशी सज्जाद इलीयास यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. व मोहम्मद अकबर व मोहम्मद जुमन यांना सुध्दा डोक्यात व इतर ठिकाणी मार लागला आहे. बस चालक किरण दुवे यांनी रात्रीची वेळ असतानादेखील वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून, भरधाव वेगाने व निष्काळजीपणे बस चालवुन या अपघातास,व प्रवाशांना गंभीर जखमी करून रिक्षाच्या नुकसानीस ठरला आहे.
याप्रकरणी नितीन नागोराव चंदनशिव यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एसटीबस चालक किरण रावण दुवे यांच्यावर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 281,125 (अ), 125 (ब). मोटार वाहन कायदा कलम 184,119/107 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश कोल्हे करत आहेत.






