पुणे: पुण्यातून एक मोठी आणि (Gaja Marane) खळबळजनक बातमी (Pune News) समोर आली आहे. मोक्का कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या (Pune Crime) कुख्यात गुंड गजानन मारणे याला विशेष मोक्का न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. एका आयटी अभियंता तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी 24 फेब्रुवारी रोजी गजानन मारणेला अटक झाली होती आणि कोथरूड पोलिसांनी त्याच्यावर मोक्का लावला होता.

हा गुन्हा 19 फेब्रुवारी रोजी घडला होता. कोथरूडमधील आयटी अभियंता तरुण दुचाकीवरून घरी जात असताना भेलकेनगर परिसरात गर्दीतून दुचाकी काढण्याच्या प्रयत्नात तिघांनी त्याला बेदम मारहाण केली होती. या तरुणाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी ओम धर्मजिज्ञासू, किरण पडवळ, अमोल तापकीर या तिघांना अटक केली होती. या आरोपींचे संबंध मारणे टोळीशी असल्याचे तपासात उघड झाले.
या घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींसह टोळीप्रमुख गजानन मारणे आणि त्याचा भाचा रुपेश मारणे यांच्यावर मकोका कायद्यान्वये कारवाई केली होती.
मात्र, या खटल्यात अनपेक्षित वळण आले. तक्रारदार असलेले देवेंद्र जोग यांनी स्वतः विशेष मोक्का न्यायालयात हजर होऊन एक महत्त्वाचे प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्पष्ट केले की, त्यांना मारहाणीसाठी कोणीही चिथावणी दिली नव्हती आणि आता त्यांना आरोपींविरुद्ध कोणतीही तक्रार करायची नाही. तक्रारदाराच्या या भूमिकेमुळे गजानन मारणेच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला, जो न्यायालयाने मंजूर केला. या निर्णयामुळे राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.






