पुणे, ता. 12 : कल्याणीनगर-येरवडा परिसरातील एका लॉजवर ग्राहकांना फोन करून मुली पुरवून वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सापळा रचून कारवाई केली. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून केलेल्या या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली असून, रिक्षाचालकासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनिल साहेबराव कु-हाडे (वय 35, रा. राहुलनगर, निगडी) व त्याच्या इतर 4 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे सहाय्यक फौजदार ईश्वर म्हातारदेव आंधळे यांनी सरकारच्या वतीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही मोबाईल क्रमांकांवरून ग्राहकांशी संपर्क साधून त्यांना मुली पुरविल्या जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. एका ग्राहकासाठी सुमारे पाच हजार रुपये दर ठरवून मुलींना कल्याणीनगर, येरवडा परिसरातील लॉजवर पाठविले जात असल्याचा संशय पोलिसांना होता.

या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी एका व्यक्तीला बनावट ग्राहक म्हणून तयार केले. त्याच्यामार्फत संबंधित मोबाईलधारकाशी संपर्क साधून मुलीची मागणी करण्यात आली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने मुलींचे फोटो पाठवून पसंती करण्यास सांगितले. पसंती झाल्यानंतर कल्याणीनगरमधील एका लॉजमध्ये खोली बुक करण्यास सांगून मुलगी तेथे पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांच्या सूचनेनुसार बनावट ग्राहकाला पैसे देण्यात आले. त्यानंतर तो लॉजमध्ये पोहोचला. ठरल्याप्रमाणे मुलगी खोलीत आल्यानंतर बनावट ग्राहकाने पोलिसांना व्हॉट्सॲपवर संदेश पाठवून इशारा दिला. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने हॉटेलच्या खोलीवर छापा टाकला. छाप्यात एक महिला बनावट ग्राहकासोबत आढळून आली. चौकशीदरम्यान तिने काही व्यक्तींच्या माध्यमातून तिला या प्रकारच्या कामासाठी प्रवृत्त करण्यात आल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
दरम्यान, संबंधित महिलेने शेजारील खोलीत आणखी दोन महिला असल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्या खोलीचीही तपासणी केली. तेथे आणखी दोन महिला आढळून आल्या. तिन्ही महिलांची सुटका करून त्यांना महिला पोलिसांच्या ताब्यात सुरक्षिततेसाठी देण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या छाप्यानंतर लॉजच्या बाहेर थांबलेल्या रिक्षाचालकाची पोलिसांनी चौकशी केली. सुनिल कु-हाडे असे त्याचे नाव असल्याचे समोर आले. संबंधित एजंटच्या सांगण्यावरून ग्राहकांसाठी महिलांना वेगवेगळ्या लॉजवर पोहोचविल्याचे त्याने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी पाच हजार रुपयांची रोकड, मोबाईल फोन, रिक्षा आणि अन्य साहित्य असा एकूण सुमारे 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी सुनिल कु-हाडे याच्यासह मोबाईल क्रमांकाच्या आधारे ओळख पटविण्यात येत असलेल्या अन्य व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 143(1)(3), 3(5) तसेच अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 मधील कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) केशव दिंडे करीत आहेत. फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.







