कुरकुंभ, (पुणे) : दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील फिरंगाई टेक्स्टाईल मार्केट परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये पोलिसांनी छापा टाकून अवैध वेश्याव्यवसाय पर्दाफाश करून तीन पिडीत महिलांची सुटका केली. सोमवारी ( ता. १३ ) पहाटे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. दौंड पोलिसांनी वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिस शिपाई योगेश मनोहर गोलांडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून दिवाकर मुहू शेट्टी ( वय-५४, मूळ रा. वल्लदूर तोटा, पोस्ट पादूर, ता. मणी, जि. मणी राज्य कर्नाटक ) पिंटू कुमार कैलास भुइया (वय-३१ रा. खैरा, ता.मयूरईन्ड जि. चतरा, राज्य झारखंड ), श्रीधर लक्ष्मण शेट्टी ( रा. सनशाईन ग्रीन पार्क, फादरवाडी, वसई ईस्ट, पालघर ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रतन रामचंद्र कुलंगे ( रा. कुलंगेवस्ती पांढरेवाडी, ता. दौंड जि. पुणे ) यांचे मालकीचे पत्र्याचे शेड आणि सात खोल्या आरोपींनी करार करून चालविण्यास घेतल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रतन कुलंगे यांचे मालकीचे कुरकुंभ येथील फिरंगाई टेक्स्टाईल मार्केट परिसरात पत्र्याचे शेड आणि सात खोल्या आहेत. आरोपींनी पत्र्याचे शेड आणि ७ खोल्या करार करून चालविण्यास घेतल्या आहेत. या ठिकाणी अवैद्य वेश्याव्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता पश्चिम बंगाल येथील तीन पीडित महिलांना वेश्याव्यवसाय भाग पाडण्यात आल्याचे आढळून आले. याप्रकरणी दौंड पोलिसांनी तीन आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला असून तीन महिलांची सुटका केली आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल होताच हे तीनही आरोपी फरारी झाले आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३७०, ३४ अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, ६ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत