नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहे. असे असताना एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीकडून वेश्याव्यवसाय केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थिनीला दिल्लीतून विमानाने नागपुरात आणले होते.
बेलतरोडी पोलिसांनी मनीषनगरातील हॉटेल अशोका इम्पेरियलमध्ये धाड टाकून वेश्या व्यवसायाचा भांडाफोड केला. आरोपी दिल्लीतील एका 24 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीकडून देहविक्री करून घेत होते. जवळपास आठवडाभरापूर्वी तिला विमानाने नागपुरात आणण्यात आले होते. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी हॉटेलमध्ये धाड टाकली.
बंटी ऊर्फ बिलाल अहमद अली (वय 40) असे आरोपीचे नाव आहे. बंटी याची देश-विदेशात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलालांशी ओळख आहे. याच संधीचा फायदा घेत तो देहव्यापार करवून घेण्यासाठी देश-विदेशातील तरुणींना नागपुरात आणत असतो आणि ग्राहकांना पुरवितो.
मागील काही दिवसांपासून त्याने दिल्लीतील एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला विमानाने नागपुरात बोलावून घेतले. तिला पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले. गेल्या आठ दिवसांत चांगली कमाई केल्यानंतर तिला हॉटेल अशोकामध्ये पाठविण्यात आले होते. पोलिसांना याची माहिती मिळताच सापळा रचून कारवाई करण्यात आली.