शिक्रापूर : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील किरण कुलकर्णी आत्महत्या प्रकरणातील फिर्यादी महेश कुलकर्णी यांनी आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या ११ पैकी नऊ सावकारांविरोधात दाखल फिर्याद गैरसमजातून दिल्याचे प्रतिज्ञापत्र शिक्रापूर पोलिसांकडे सादर केले आहे. या प्रकरणातील सर्व बेकायदा सावकार दहा दिवसांपासून फरार असून आता कुलकर्णी यांच्या प्रतिज्ञापत्राने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. परंतु, या सावकारांविरोधात सबळ पुरावे आमच्याकडे असल्याचा दावा शिक्रापूर पोलिसांनी केला आहे.
कोरोना काळात किराणा व्यवसाय अडचणीत आल्याने दिवंगत किरण कुलकर्णी यांनी काही खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले व ते वेळेत परत करता न आल्याने या सर्व ११ सावकारांच्या जाचाला कंटाळून त्यांनी १० तारखेला या सर्वांची नावे व त्यांनी लावलेल्या कर्जव्याजाची टक्केवारी लिहून आत्महत्या केली होती.
मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतील नवनाथ भंडारे, संतोष भंडारे, कांतिलाल रामचंद्र ढेरंगे, संदीप अरगडे (तिघेही रा. वढू बुद्रुक, ता. शिरूर), सुधाकर ढेरंगे, अमोल गव्हाणे (तिघेही रा. कोरेगाव भीमा, ता शिरूर), शांताराम सावंत (रा. वाडागाव, ता. शिरूर), अजय यादव, जनार्दन वाळुंज (रा. लोणीकंद, ता. हवेली), किशोर खळदकर (रा. जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर), मामा सातव (रा. वाघोली, ता. हवेली) यांच्यावर शिक्रापूर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे व बेकायदा सावकारकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
किरण यांचे धाकटे बंधू महेश कुलकर्णी यांनी शिक्रापूर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती. त्यावरूनच त्यांनी आता ११ पैकी नऊ जणांविरोधातील फिर्याद गैरसमजातून दाखल केल्याचे प्रतिज्ञापत्र पोलिसांकडे सादर केले. त्यापूर्वी एक दिवस त्यांनी त्यांचा संपूर्ण किराणा व्यवसायच बंद करण्याचा निर्णय घेत असल्याचेही जाहीर केले होते. आता त्यांच्या या नव्या भूमिकेने एकच खळबळ उडाली आहे.
सुधाकर व कांतिलाल ढेरंगे यांच्याशिवाय उर्वरित नऊ जणांनी यापुढे हे सर्वजण आपल्याला पैसे मागणार नाहीत आणि त्रासही देणार नाहीत, असे लेखी प्रतिज्ञापत्र आम्हाला दिल्याने मी या नऊ जणांच्या विरोधातील तक्रार गैरसमजातून झाल्याचे प्रतिज्ञापत्र पोलिसांना सादर केले आहे. मात्र, सुधाकर व कांतिलाल ढेरंगे यांच्या विरोधातील लढाई मी चालू ठेवणार आहे.
– महेश कुलकर्णी, फिर्यादी
फिर्यादीने गैरसमजातून तक्रार दिली, असे शपथ पत्र लिहून दिल्याने तपास बंद केलेला नाही, पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे.
महेश डोंगरे, पोलिस उपनिरीक्षक, शिक्रापूर