पुणे: पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ११ जुलैच्या मध्यरात्रीपासून २४ जुलै २०२५ च्या रात्री १२ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) आणि (३) अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत.

या आदेशांनुसार, सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, कोणतेही शस्त्र, स्फोटक पदार्थ, दगड, काठी, तलवार, बंदूक किंवा कोणतीही शारीरिक इजा करण्यास कारणीभूत ठरू शकेल अशी वस्तू सोबत ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.
कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्च घोषणा देणे, वाद्य वाजविणे आवेशपूर्ण भाषणे किंवा राज्याच्या सुरक्षिततेस बाधा आणू शकतील अशा कोणत्याही कृतीवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांची पूर्वपरवानगी आवश्यक राहणार आहे.
या आदेशाची अंमलबजावणी दरम्यान काही अपवादही ठेवण्यात आले आहेत. शासन सेवेत असलेल्या व्यक्ती आणि ज्यांना अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शस्त्र बाळगण्याची अधिकृत परवानगी आहे, त्यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
जर कोणी या आदेशाचे उल्लंघन करताना आढळले, तर संबंधित व्यक्तीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे आगामी काही दिवस पुणे ग्रामीणमध्ये कडक शिस्तीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.







