संदीप टूले
केडगाव : शेतकऱ्यांचे जीवन अस्मानी संकटांनी व सरकारी धोरणामुळे अगदी काकुळतीला आले आहे. असे असले तरी शेतकरी पुन्हा ताकदीने उभा राहत आहे. परंतु त्याला पाहिजे अशी मदत तर मिळत नाहीच, मात्र महागाईने त्यांचे कंबरडेच मोडत आहे. आता शेतकरी आगामी खरीप हंगामाची तयारी करत असतानाच रासायनिक खताच्या भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून पुढारी मात्र प्रचारात व्यस्त झालेले दिसत आहेत. त्यात गेल्या काही वर्षांत सततची वाढच होत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र बिघडत असल्याची स्थिती आहे.
दौंड तालुक्यासह पुणे जिल्ह्यात खरिप हंगामाची सुरुवात जून महिन्यात होत असली तरी मे महिन्यापासूनच खताची खरेदी होते. कारण या भागात उसांच्या लागवडीचा हंगाम सुरू होतो, त्यामुळे या बेसल डोसासाठी खते खरेदी करावी लागतात. पण अचानकच काही खतांच्या भावात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित मात्र कोलमडले आहे.
त्यात डिझेल ची दरवाढ गगनाला भिडलेली त्यामुळे ट्रॅक्टरमार्फत होणारी शेती आंतरमशागतीचा खर्च वाढला आहे. प्रतिएकर तीनशे ते चारशे रुपयापर्यंत नांगरणीचा खर्च वाढला असून २ हजार रुपये प्रतिएकर नांगरणी झाली आहे. वाढत्या महागाईचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. खत, बियाणे, रोजगार, अन् मशागतीसाठी लागणारे यंत्र यांच्या किमती प्रचंड वाढत आहेत. त्यातुलनेत शेतमालाचे बाजारभाव स्थिर असल्याने शेतकऱ्याचे पैशांचे गणित हुकत आहे.
सध्या काढणी चालू असलेले कांदा विकण्यासही परवडेना, म्हणून तो आहे असाच वाखरीत, तर काही शेतकऱ्यांचा शेतातच पडून आहे, उसाचे भावही ३ हजारांच्या पुढे जाईना. शेतीला जोड धंदा दुध व्यवसाय केला जातो. तर त्याचे दर पडलेले म्हणजे सर्वच बाजूंनी शेतकरी अडचणीत आहे. वाढणारा खर्च आणि शेतमालाचे घटणारे बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेटचे व्यवस्थित बस्तान बसताना दिसत नाही. त्यामुळे सरकारने ही या शेतकऱ्यांच्या व्यथा कडे लक्ष देणे गरजेचे आहे.
उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतमालाच्या बाजारभावात मात्र घट होत आहे. यामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. उत्पादन खर्चात सर्वात महत्त्वाचा घटक असणाऱ्या खताच्या भावातच वाढ होत असल्याने शेती क्षेत्र आता आर्थिकदृष्ट्या परवडणारे दिसत नाही. शेतकऱ्यांचा पिकांना हमी भाव तर नाहीच पण कमीत कमी सरकारने खतांच्या वाढत्या भावाकडे लक्ष द्यावे.
-दत्तात्रय भाऊसो शेळके, तरुण शेतकरी