बापू मुळीक
पुरंदर : पुरंदर विधानसभा मतदारसंघाची विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून, निवडणूक काळामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी केले आहे. याबाबत पुरंदर तहसील कार्यालयातून निवडणूक निर्णय अधिकारी लांडगे यांनी माहिती दिली.
विधानसभा निवडणुकीसाठी पुरंदर तहसील कार्यालयात येत्या 22 ऑक्टोबरपासून ते 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्विकारण्यात येणार असून, 30 ऑक्टोबर रोजी या उमेदवार अर्जाची छाननी होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडेल. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रचार काळात आक्षेपार्ह विधाने, सोशल मीडिया व पेड न्यूज यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके नेमण्यात आली असून, उमेदवारांनी सादर केलेला खर्च व प्रत्यक्ष व्हिडिओ चित्रीकरण करुन खर्चात आलेली तफावत याचे निरीक्षण करण्यासाठी पथके नेमण्यात आली, असे लांडगे यांनी सांगितले.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी याच्या अधिपत्याखाली 23 विषय पथके,11-sst, 9-fst, 4-vst आणि 3-vvt अशा विविध पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये आज अखेर पुरुष मतदार 2,38,001, मतदार आहेत. तर महिला मतदार 2,20,249 मतदार आहेत. इतर 32 मतदार आहेत.
एकूण 4,58,282, एवढे आज रोजी मतदार आहेत. त्यापैकी दिव्यांग मतदारांची संख्या 4,075 व 85 पेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांची संख्या 8,428 आहे. तसेच सैनिक मतदार 613 आहेत. सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी 2,198 मनुष्यबळाची नियुक्ती करणे प्रस्तावित आहे. 413 मतदान केंदावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान यंत्रे ठेवण्यासाठी तळ मजला, नवीन प्रशासकीय इमारत, सासवड (पुरंदर) येथे सुरक्षा कक्ष तयार करण्यात आले आहे.
त्याच ठिकाणी मतदान साहित्य वाटप व मतदान साहित्य स्वीकारण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. 23 ऑक्टोबर 2024 रोजी मतमोजणी पार पाडण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर वीज, पाणी व उन्हापासून संरक्षणासाठी व्यवस्था परिस्थितीनुसार करण्यात येणार असून, खोटी माहिती व अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याचा इशारा लांडगे यांनी दिला आहे.