पुणे : जलसंपदा विभागाच्या पुणे जिल्ह्यासह दौंड विधानसभा मतदार संघाशी निगडीत विविध विषयांबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली आहे.
यामध्ये जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रुपांतरण करणे व अस्तरीकरण कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळण्याची मागणी करण्यात आली. विस्तार व सुधारणाअंतर्गत जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेंतर्गत कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणाली मध्ये रूपांतरण करणे यासाठी सुमारे ४२९.८६ कोटी किंमतीच्या प्रस्तावास दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी मंत्रीमंडळ बैठकीत तत्वतः मान्यता दिली असून, शासनस्तरावरून उपस्थित शे-यांची पुर्तता करून प्रस्ताव महामंडळाचे पत्रान्वये दि. २३ डिसेंबर २०२४ रोजी शासनास सादर करण्यात आला आहे.
पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या कुपटेवाडी, ता. दौंड येथील वितरिकेच्या वरील वंचित भागाच्या सिंचनासाठी नवीन पाईप लाईन करण्यासाठी सर्वेक्षण करणे व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. याबाबत सर्वेक्षण व सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी सुमारे १७.४३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तातडीने सर्वेक्षण पूर्ण करून प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याचे आदेश यावेळी दिले.
जलविद्युत निर्मितीसाठी मुळशी व कोयना प्रकल्पाद्वारे कृष्णा खोऱ्यातील नैसर्गिकरित्या पूर्वमुखी नद्यांचे कृत्रिमपणे पश्चिमेकडील विपुलतेच्या खोऱ्यात वळविलेले पाणी पूर्वेकडे तुटीच्या खोऱ्यात वळविण्याबाबत सुर्वे समितीचा अहवाल सादर करण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या समवेत बैठक घेऊन त्यासाठी आवश्यक अहवाल संबधित विभागाने तयार करावेत. ग्रामीण भागाला पाणी मिळावे यासाठी मुळशी धरणाची उंची वाढविणे, मोठ्या प्रमाणावर असलेल्या मृत साठ्याचा उपयोग करणे, विद्युत निर्मितीसाठी इतर गोष्टींचा उपयोग करणे आदी बाबीचा सदर बैठकीत निर्णय घेण्यात येईल.
दौंड तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅंक वॉटर क्षेत्रात बुडीत बंधारे बांधणेसाठी सुधारित धोरण ठरविणे व बुडीत बंधारे बांधणेसाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली, कार्यकारी संचालक, कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून त्याचा अहवाल लवकर सादर करावा अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या.
दौंड तालुकातील खानोटा येथील क्रमांक ५०४ ते ५०७ मधील शिल्लक १२८ घरांचे संपादन व पुनर्वसन करण्याबाबत आवश्यक कार्यवाही शासन स्तरावर सुरु असून, तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्यात येईल असे आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिले. तालुक्यातील चिबड, खारवट व पाणथळ शेतजमिनीने सर्वेक्षण पूर्ण करून प्रस्ताव सादर करणेबाबत व त्यास मान्यता मिळणेबाबत मापदंड मंजुरीसाठी आवश्यक कार्यवाही शासन स्तरावर सुरु असून, वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.
वित्त विभागाच्या मान्यतेनंतर याबाबत प्रस्तावांना मान्यता देण्यात येईल तर खडकवासला ते फुरसुंगी बंद नळी कालवा व जुना मुठा उजवा कालवा (बेबी कॅनॉल) यांना राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेला निधी व सुरु असलेली कामे यांचा आढावा, पर्यावरण व वन विषयक मान्यतेचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. रेल्वे क्रॉसिंग कामासाठी संकल्पन आराखडा व भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीत आहे. सन २०२५ – २६ मध्ये शाफ्टचे काम पुर्ण करुन बोगद्याचे काम सुरु करणेचे नियोजित आहे. मार्च २०२५ अखेर बोगद्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे विखे यांनी सांगितले, तसेच बेबी कॅनॉलचे काम देखील लवकरच पूर्ण करण्याच्या सूचना विखे पाटील यांनी संबंधितांना दिल्या आहेत.
यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, अपर मुख्य सचिव दीपक कपूर, कार्यकारी संचालक अतुल कोपोले, मुळशी धरण समितीचे अविनाश सुर्वे, मुख्य अभियंता हनुमंत गुनाले, हनुमंत धुमाळ यांच्यासह जलसंपदा विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.