संदीप टूले
केडगाव : लोकसभा निवडणुकीचा ज्वर जसजसा चढू लागला तसतसा बारामती लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे, महाविकास आघाडीचे उमेदवार ठरताच राजकीय धुळवड सुरू झाली आहे. सध्या सगळ्याच पक्षांकडून घोंगडी बैठकांचा सपाटा लावला आहे. त्यात बारामती लढत ही तुल्यबळ होणार असल्यामुळे विजयासाठी राजकीय नेत्यांची घालमेल सध्या वाढत चालली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. ग्रामीण भागात आता उन्हाबरोबरच राजकारणही तापू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सध्या लोकसभा निवडणुकांच्या राजकीय गणितांची चर्चा दौंड तालुक्यातील पारावर बसणाऱ्यांमध्ये जोरात सुरू आहे. अनेक सार्वजनिक कार्यक्रमात याची झलक दिसू लागली आहे. थोड्या फार प्रमाणात सार्वजनिक कार्यक्रमात एकमेकांवर टीका सुरू झाली आहे. मतदारसंघातील कट्टर विरोध असलेल्या युती आणि आघाडीचे तसेच बहुजन आघाडीचे (ओबीसी पर्व) उमेदवार ठरलेही आहेत. त्यामुळे गावच्या पारावर रंगणार्या चर्चा आता सोशल मीडियावर जोरात सुरू झाल्या आहेत. तर सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सोशल मीडियातून एकमेकांचे उणेधुणे काढत आहेत.
गावोगावी नेत्यांची अधिकृत-अनधिकृत सोशल मीडिया फौजच जणू तयार झाली आहे. या प्रकारांमुळे मतदारसंघात सर्वत्र राजकीय वातावरण तापलेले आहे. नेत्यांच्या अगोदर ही फौजच एकमेकांवर चालून जात आहे. मतदारसंघातील अनेक राजकीय स्पर्धकही एकमेकांवर अगदी तुटून पडले आहेत. यातून कार्यकर्त्यांमध्ये अनेक वादविवाद सुरू झाले आहेत.
एकीकडे राजकीय पुढारी गावोगावी फिरून कार्यकर्त्यांशी जोरदार संपर्क दौरे करत आहेत. तर महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांमध्ये तयार झालेली मोठी दुफळी पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थितीने संपुष्टात आली असली तरी मतदानापर्यंत ते मदत करतील की नाही याची धाकधूक उमेदवारांच्या मनात कायम आहे. एकंदरीत राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
पक्षश्रेष्ठींकडे ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात
लोकसभेचे गणित लक्षात घेता विधानसभा निवडणुकांसाठी नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामधून अनेक गमती-जमती होत आहेत. तर काही नेते आपल्या महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्याच्या कार्यक्रमाला दांडी मारत आहेत. तर काहींना पक्षातील कार्यकर्ते सांभाळून ठेवण्याची कसरत त्यांना करावी लागत आहे. दौंड तालुक्यात राजकीय पक्षांकडे आपापली तगडी फौज असल्याने राजकीय प्रचार, दौर्यांना जोरदार सुरूवात झाली आहे.
विधानसभा इच्छुकांनी वाढवले प्रचारदौरे
काही नेत्यांनी तर आतापासूनच आपणच आगामी विधानसभेचे उमेदवार असल्याचे घोषित करत प्रचारदौरे वाढवले आहेत. तर काही ठिकाणी आपल्याच महायुती पक्षातील काही राजकारण्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आखले जात असल्याची राजकीय चर्चा आहे. राजकीय वातावरण असे रंगले असताना राजकारणाबरोबर उन्हाच्या झळाही मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागत आहेत.