Police Recruitment उरुळी कांचन : हिंगणगाव (ता. हवेली) येथे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या छाया जगताप यांचा मुलगा सागर बळीराम जगताप हा पोलीस भरतीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. सागरने मिळविलेल्या यशाबद्दल त्याच्यावर राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सागरचे वडील हे बळीराम जगताप हिंगणगाव येथे मोलमजुरी करून कुटुंब चालवीत होते. तर आई दोन मुले व तीन मुलींची जबाबदारी पार पडत होती. मात्र सागर हा अवघ्या ८ वर्षाचा असताना त्याचे वडील बळीराम यांचे आकस्मित निधन झाले होते. त्यांच्या निधानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी आई छाया जगताप यांच्यावर पडली. त्यानंतर छाया जगताप यांनी न डगमगता कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून मोलमजुरी करण्याचा निर्णय घेतला. आणि कष्टातून वसंत फुलवून मुलांना चांगले शिक्षण दिले.
सागर जगतापने प्राथमिक शिक्षण हिंगणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर दहावी पर्यंतचे शिक्षण लोकनेते दादा जाधवराव माध्यमिक विद्यालयातून पूर्ण केले. सागरने १२ वीचे शिक्षण उरुळी कांचन येथील महात्मा गांधी महाविद्यालयातून घेतले. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने सागरने पुढील शिक्षणाच्या ऐवजी काम करण्याचा निर्णय घेतला. आणि सलग पाच ते सहा वर्ष बदली ड्रायव्हर म्हणून काम करू लागला. परंतु, सागराने पोलीस व्हायचं पाहिलेले स्वप्न त्याला झोपू देत नव्हते. मग सागरने काम करीत पोलीस भरतीचा अभ्यास आणि सराव करण्यास सुरवात केली.
नागरिकांकडून भरभरून कौतुक..!
पुणे शहर पोलीस भरती २०२१ च्या पोलीस शिपायांच्या जागेच्या भरतीसाठी सागरने अर्ज केला होता. कोरोना काळामुळे ही पोलीस भरतीची परीक्षा लांबविली होती. या भरतीची लेखी परीक्षा मार्च महिन्यात झाली. या परीक्षेत सागर भरघोस गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. वडिलांचे छत्र हरविल्यानंतरही छाया जगताप यांनी कुटुंबाची योग्य जबाबदारी स्वीकारून मुलाला पोलीस बनविले. यामुळे सागर व त्याची आई छाया या दोघांचे नागरिकांकडून भरभरून कौतुक केले आहे.
दरम्यान, पोलीस भारती परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुले मुली लाखो रुपये भरून क्लास लावतात. परंतु सागरने कोणताही क्लास न लावता घरीच अभ्यास केला आणि यश मिळविले आहे. त्यांच्या या यशामुळे गावातील युवकांना प्रेरणा मिळाली आहे. परिस्थिती नसताना सागरने यशाचे शिखर गाठून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
याबाबत पुणे प्राईम न्यूजशी बोलताना सागर जगताप म्हणाला…!
आईने केलेल्या कष्टाचे मला फळ मिळाले आहे. त्यामुळे मिळालेले हे यश आईच्या चरणी अर्पण करीत आहे. तसेच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी अपयश आले तर खचून जावू नये. त्या अपयशाला जिद्द, चिकाटी, मेहनत, सराव आणि अभ्यासाची जोड दिल्यास यश निश्चित मिळते, ध्येय नक्कीच गाठता येते. असे सागर जगताप याने सांगितले.