अजित जगताप
Police Recruitment वडूज : माणसाच्या अंगी जिद्द असेल व नातेवाईक, गुरुजनांचा आशीर्वाद लाभला की, पाहिलेले स्वप्न साकार होऊ शकते. याचे ज्वलंत उदाहरण खटाव तालुक्यातील वडूज नगरीमध्ये पाहण्यास मिळाले. कुमारी प्रिया पावडे या युवतीने पोलीस Police Recruitment दलात खडतर परिश्रम करून प्रवेश मिळवला आहे. याबद्दल तिचे मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
आईचा विजेचा झटका लागून निधन…
गरिबीचे चटके सहन करीत उदरनिर्वाहासाठी नांदेड येथून भटकंती करत वडूज नगरीत आलेल्या पावडे कुटुंबीयांनी मोलमजुरी केली. अनेक कष्टमय मेहनत घेतली तसेच वाहन चालक म्हणूनही काम केले. हे सर्व करत असताना त्यांना अनेक दुःखद प्रसंगाला सामोरे जावे लागले. २०१४ साली प्रियाची आईला विजेचा झटका लागून दुःखद निधन झाले. तर भाऊ प्रमोद याचा अचानकपणाने अपघात होऊन कायमस्वरूपी त्याचा एक पाय काढावा लागला.
या दुःखद प्रसंगाला सामोरे जात असताना आपले अश्रू डोळ्यात साठवून देवदूता प्रमाणे त्यांची विवाहित बहीण वर्षा व भाऊजी रुस्तमराव बेंडे यांनी आपल्या भाकरीतील अर्धी भाकरी ही प्रिया, धुराजी, प्रमोद व वडील पंजाबराव यांना दिली.
पंजाबराव हे काबड कष्ट करत होते. परंतु त्यांच्या संसाराला फारसा हातभार लागत नव्हता. मुलं मोठी होतील. कर्तबगार होतील. असं स्वप्न त्यांनी पाहिले. आर्थिक संकटामुळे त्यांना ते स्वप्न पूर्ण करता आले नाही. परंतु जिद्दीच्या जोरावर त्यांच्या मुलीने पोलीस दलात भरती होऊन स्वप्न पूर्ण केले. हे पण दिवस जातील हे सिद्ध करून दाखवले आहे. माणसाच्या गुणवत्ता असेल तर त्याला चारी बाजूने मदत व सहकार्य मिळते.
प्रिया पावडे हिला छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील शिक्षण संस्था उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यांनी खूप मोलाचे सहकार्य केले आहे. वडूज नगरीतील हुतात्मा हायस्कूलच्या शिक्षिका बी. एस. माने मॅडम व जय मल्हार भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमीचे प्रा. बनाजी पाटोळे सर यांनीही प्रियाच्या गरिबीची जाण ठेवून तिला विनाशुल्क जय मल्हार पोलीस भरतीपूर्व अकॅडमी मध्ये प्रवेश दिला.
अत्यंत कष्टमय व परिश्रम करत प्रियाने पोलीस भरतीचा प्रयत्न सुरू केला. पण अवघ्या दोन गुणांनी तिचे स्वप्न भंगले होते. पुन्हा फिनिक्स पक्षासारखे ती उभी राहिली. फक्त समोर दिसत होते ती फक्त वर्दी. त्यामुळे तिने जिद्दीने पुन्हा अभ्यास केला. शारीरिक क्षमता वाढवली आणि आज ती पोलीस भरतीसाठी सज्ज झालेली आहे. पुणे या ठिकाणी आता पुढील प्रशिक्षण पूर्ण करून ती समाजाच्या रक्षणासाठी उभी राहणार आहे.
दरम्यान, प्रियाचा जय मल्हार अकॅडमीचे बनाजी पाटोळे, भाजपचे नगरसेवक ओंकार चव्हाण, खटाव तालुका पत्रकार परिषदेचे सचिव नितीन राऊत व अजित जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ऋषिकेश पडळकर, उत्तमराव म्हस्के, सौ वर्षा भेंडे व आधी मान्यवर उपस्थित होते.