गोरख जाधव

डोर्लेवाडी, (पुणे) : बारामती तालुक्यातील झारगडवाडी आणि सोनगाव गावांमध्ये बेकायदेशीररित्या केमिकलयुक्त ताडी, गावठी हातभट्टी आणि नकली दारूचा व्यवसाय अत्यंत जोमात सुरू असून, या काळ्या धंद्यांनी संपूर्ण परिसराला विळखा घातला आहे. गेल्या वर्षी याच विषारी व केमिकलयुक्त ताडीमुळे तब्बल 22 जणांचा नाहक बळी गेल्याची काळी पार्श्वभूमी असतानाही, बारामतीचे राज्य उत्पादन शुल्क (Excise) विभाग मात्र सुस्त असून केवळ ‘हप्तेखोरी’ आणि ‘तात्पुरत्या कारवाया’ करून गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

“गावातील तरुण पिढी या जीवघेण्या नशेच्या विळख्यात पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. हे सर्व काळे धंदे कायमचे बंद करावेत,” अशी आक्रमक मागणी तत्कालीन उपसरपंच मोनाली राऊत, संघर्ष लोक संचालित महिला केंद्राच्या तालुकाध्यक्षा शोभा घनवट, पूनम नेवसे, वैशाली कर्णे आदी महिलांनी व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थ, महिला बचत गट आणि ग्रामपंचायत सदस्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे हजारो तक्रारी केल्या, रस्ता रोको केले आणि उपोषणेही केली. मात्र, भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.
बारामती तालुक्यातील झारगडवाडी हे गाव सध्या अवैध आणि विषारी ताडी विक्रीचे मुख्य केंद्र बनले आहे. बारामतीतील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक व अधीक्षक यांना यासंबंधी वारंवार ठोस माहिती देऊनही त्यांच्याकडून जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याच अधिकाऱ्यांच्या आर्थिक वरदहस्तामुळे डोर्लेवाडीत पूर्वी जेथे केवळ चार अवैध व्यवसाय सुरू होते, त्यांची संख्या आता वाढून थेट 12 वर जाऊन पोहोचली असल्याचाआरोप नागरिकांनी केला आहे.
या केमिकलयुक्त दारू आणि ताडीवाल्यांनी झारगडवाडी, सोनगाव परिसरात प्रचंड हौदास घातला आहे. प्रत्येक गल्लीबोळात मिळणाऱ्या या सुसाट नशेमुळे अनेक गोरगरीब आणि कष्टकरी कुटुंबे रस्त्यावर आली असून अनेक महिलांचे कुंकू पुसले गेले आहे. केवळ स्वतःचे खिसे भरण्यासाठी निष्पाप लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या दारू माफियांना बारामतीचे उत्पादन शुल्क विभाग तात्पुरती कारवाईचे नाटक करून स्वतःच अभय देत असल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, बारामती तालुक्यासाठी आणि या गावांच्या विकासासाठी शासनाकडून मोठा निधी मिळाल्याने गावे स्वच्छ आणि सुंदर बनत आहेत. या परिसरात जनावरांचा मोठा बाजारही सुरू होत आहे. मात्र, एकीकडे भौतिक विकास होत असताना दुसरीकडे विषारी ताडी आणि अवैध दारूमुळे गाव बदनाम होऊ लागले आहे. जर हे अवैध धंदे असेच राजरोसपणे सुरू राहिले, तर गावचा होणारा हा विकास डोळ्यांनी पाहण्यासाठी गावात तरुण वर्गच शिल्लक राहणार नाही, अशी अत्यंत भीतीदायक आणि करुण स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, आता या अत्यंत भीतीदायक स्थितीत बारामतीची पोलीस आणि उत्पादन शुल्क यंत्रणा जागे होणार की आणखी बळी जाण्याची वाट पाहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







