पुणे : महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ, अनधिकृत उत्पादन केंद्रे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर धडक कारवाया सुरू केल्या आहेत. मात्र, पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते कुरकुंभ या पट्ट्यातील शेकडो हॉटेल्स आणि बेकरी दुकानांच्या कामकाजाबाबत नागरिकांकडून विविध तक्रारी आणि प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, पूर्व हवेली परिसरातील अनेक हॉटेल्स आणि बेकरी दुकानांमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही ठिकाणी परिसरात दुर्गंधी पसरत असून, नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरू शकणारे अन्नपदार्थ विकले जात असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. या सर्व बाबींची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी FDA ने विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

हडपसर, शेवाळवाडी, मांजरी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन तसेच दौंड तालुक्यातील यवत, केडगाव, वरवंड, पाटस आणि कुरकुंभ या परिसरात मोठ्या प्रमाणावर हॉटेल आणि बेकरी व्यवसाय सुरू आहेत. या ठिकाणी अन्नसुरक्षा नियमांचे पालन, स्वच्छता आणि आवश्यक परवान्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही बेकरींमध्ये अस्वच्छ वातावरण, उंदरांचा वावर, गलिच्छ कपड्यांमध्ये काम करणारे कर्मचारी, उत्पादन विभागालगत अस्वच्छ स्वच्छतागृहे आणि अन्नसुरक्षा निकषांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. तसेच काही व्यावसायिकांकडे आवश्यक परवाने अथवा अन्नसुरक्षा मानकांचे पालन होत नसल्याचाही आरोप केला जात आहे. या सर्व आरोपांची अधिकृत पडताळणी संबंधित यंत्रणांनी करणे आवश्यक आहे.
अन्न व औषध प्रशासनाने या संपूर्ण पट्ट्यात व्यापक तपासणी मोहीम राबवून प्रत्येक हॉटेल, बेकरी आणि खाद्यपदार्थ उत्पादन केंद्राची सखोल पाहणी करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी. अशा मोहिमेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार उघडकीस येऊ शकतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
एफडीएकडून सर्वंकष तपासणी कधी होणार?
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या धडक कारवाईच्या पार्श्वभूमीवर, पुणे–सोलापूर महामार्गावरील या संवेदनशील पट्ट्यातही विशेष मोहीम राबवली जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड न करता दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. पुणे–सोलापूर महामार्गावरील हॉटेल आणि बेकऱ्यांची एफडीएकडून सर्वंकष तपासणी कधी होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






