पुणे : नीट पेपरफुटी आणि तत्कालीन शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीत 35 दिवस आंदोलन करणाऱ्या ‘कॉक्रोच जनता पार्टी ‘च्या अडचणींत आता मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. मात्र, आता ही संघटना केंद्रीय आणि राज्य तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आली असून, त्यांना मिळालेल्या परदेशी निधीची चौकशी केली जात आहे.

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे . महाराष्ट्राचा गृहविभाग आणि केंद्रीय यंत्रणा (ED) या आंदोलनाशी संबंधित निधीची चौकशी करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर या निधीचा उपयोग चांगल्या कार्यासाठी होत असेल तर हरकत नाही; परंतु देश किंवा समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठी या पैशांचा वापर केला जात असल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा भोयर यांनी दिला.

काय आहे ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा पार्श्वभूमी?
स्थापना: 16 मे 2026 रोजी सरन्यायाधीशांच्या एका टिप्पणीनंतर अभिजीत दिपके यांनी या डिजिटल पक्षाची सुरुवात केली. अल्पावधीतच या पक्षाला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला.
आंदोलन: बोस्टन विद्यापीठातून भारतात परतलेल्या दिपके यांनी परवानगी घेऊन जंतरमंतरवर आंदोलन उभारले. या आंदोलनाला सोनम वांगचुक यांच्यासह हजारो तरुणांचा पाठिंबा मिळाला.
यश: आंदोलनामुळे सरकारला काही मागण्या मान्य कराव्या लागल्या आणि तत्कालीन शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला.
दरम्यान, सुरुवातीपासूनच भाजप आणि एनडीएच्या नेत्यांनी या पक्षावर परदेशी निधी मिळत असल्याचे आरोप केले होते. यावर सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी ‘सरकारला संशय असल्यास त्यांनी खुशाल चौकशी करावी,’ असे आव्हान दिले होते.
दुसरीकडे, विरोधकांनी या चौकशीवर टीका केली असून, हे आंदोलन दडपण्यासाठी आणि सीजेपीला बदनाम करण्यासाठीच ही कारवाई केली जात असल्याचा आरोप केला आहे. आता या चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






