भिगवण : वटपौर्णिमेचे औचित्य साधून भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. वातावरणात सातत्याने बदल होत आहेत, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. जागतिक तापमान वाढीचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे.
निसर्गाची झपाटय़ाने होत असलेल्या हानीमुळे तापमानात वाढ झालेली आहे. औद्योगिकीकरणामुळे रस्त्यांचे जाळे पसरलेले असले, तरी रस्त्यालगत वृक्षांची वाणवा आहे. तर दुसरीकडे भिगवण व परिसरात दररोज येणाऱ्या हजारो वाहनांमधून सोडण्यात येणारा कार्बनडॉक्साइड वायूचाही परिणाम होत आहे. तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्षलागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे.
यावेळी उपस्थित महिलांच्या वतीने वडाच्या झाडाचे पूजन करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी सरपंच दीपिका क्षीरसागर, उपसरपंच मुमताज शेख, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय परदेशी, संजय देहाडे, प्रा.तुषार क्षीरसागर, जावेद शेख, तृप्ती जाधव, प्रतिमा देहाडे, मनिषा उंडे, महिला व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, आपण निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन सरपंच दीपिका क्षीरसागर यांनी केले.