Pimpari News : पिंपरी, ता.१० : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या हद्दीतील सर्व जलतरण तलावांचे ‘सुरक्षा ऑडिट’ करण्यात येणार आहे. त्याची तात्काळ कार्यवाही सुरू करण्यात येईल, अशी माहिती महापालिका क्रीडा विभागाचे अधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिली.
महापालिका प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कासारवाडी जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिकेज झाल्याची घटना घडली. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पोहोण्यासाठी आलेले नागरिक, जीवरक्षक, सुरक्षा रक्षक अशा २२ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. यासंदर्भात माहिती मिळताच भाजपा आमदार महेश लांडगे यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. उपचारार्थी नागरिकांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
दरम्यान, या दुर्घटनेत खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या उपचाराचा खर्च पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने करावा. महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व जलतरण तलावांचे सुरक्षा ऑडिट करावे. भविष्यात अशी घटना समोर येवू नये. यासाठी प्रशासनाने संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावावी. तसेच, दोषींवर कारवाई करावी, अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी केली.
कासारवाडी जलतरण तलावावर गॅस लिकेजची घटना घडली. यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होवू लागला. रुग्णालयात दाखल करावे लागले. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. महापालिका प्रशासनाने गांभीर्याने या घटनेची चौकशी करावी. तसेच, सर्वच जलतरण तलावावरील संबंधित ठेकेदार, एजन्सी यांना सुरक्षा ऑडिट बंधनकारक करावे. नागरिकांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करू नये, अशी सूचना प्रशासनाला केली आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.