लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर दुचाकीने दिलेल्या धडकेत एका वाटसरूचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील राधाकृष्ण लॉजच्या समोर मंगळवारी (ता.७) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
कुंडलिक ज्ञानोबा कुडके (वय-50, सध्या रा. मांजरी फार्म, ता. हवेली. मूळ रा. वरवटी, ता. आंबेजोगाई जि. बीड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे याप्रकरणी संजीतकुमार जागोमोची (वय-19 मूळ रा. बिहार) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंडलिक कुडके हे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पायी चालले होते. कुंजीरवाडीकडून लोणी काळभोरच्या दिशेने जात असताना, त्यांना पाठीमागून आलेल्या एक्टिवा गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात कुडके हे गंभीर जखमी होऊन त्यांच्या डोक्याला मार लागला होता. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, दुचाकी चालक पळून गेला आहे. भरधाव वेगात दुचाकी चालवून कुडके यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे करीत आहेत.