दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर शहर भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी इंदापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग बंडू शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीचे पत्र राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पांडुरंग शिंदे यांना मंगळवारी (दि.16) देण्यात आले.
इंदापूर शहर भाजपचे तत्कालीन अध्यक्ष शकील सय्यद यांची पक्षविरोधी कारवायांबद्दल पदावरून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष ऍड. शरद जामदार यांनी पत्राद्वारे इंदापूर शहराध्यक्षपदी पांडुरंग शिंदे यांची नियुक्ती केली आहे.
या निवडीबद्दल भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पांडुरंग शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. इंदापूर शहरामध्ये भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत केली जाईल. तसेच पक्षाचा जनाधार वाढवण्याचे काम करू, अशी ग्वाही नूतन शहराध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी दिली.
दरम्यान, इंदापूर शहर भाजपच्या अध्यक्षपदी पांडुरंग शिंदे यांच्या नियुक्तीचे स्वागत केले जात आहे.